शेतकऱ्यांना भावतोय सेंद्रिय शेतीचा पर्याय
By admin | Published: October 27, 2014 09:13 PM2014-10-27T21:13:00+5:302014-10-27T23:44:07+5:30
पाण्याच्या अतिरिक्त वापराने जमिनी धोक्यात
सातारा : मागील पाच दशकांमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गोधनाबरोबरच नैसर्गिक साधन संपत्तीच्या रक्षणासाठी व पर्यावरण संतुलनासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर व रासायनिक खतांचा भरमसाठ वापर शेतीला अधोगतीकडे नेत असल्याचे जाणकार शेतकऱ्यांच्या लक्षात आले असून, अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत.
पाश्चात्य संस्कृतीचे मोठे दुष्परिणाम शेतीमध्ये दिसू लागले आहेत. रासायनिक शेती, खतांच्या अतिरिक्त वापरामुळे अनेक ठिकाणी जमिनी क्षारपड झाल्या आहेत. त्यासाठी जागरुकपणे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. गोधामासारखे प्रकल्प देशात जागोजागी व्हायला हवे आहेत. ज्यामध्ये गाई अथवा म्हशींचे पालन करायला हवे.
साधारणपणे गावागावांतून असे प्रकल्प उभे राहिले, तर याद्वारे गांडूळ खतनिर्मिती, शेण खतनिर्मिती, गोमूत्रनिर्मिती होणार असून, त्याद्वारे व्यापारी शेती करणेही शक्य होणार आहे. असे उपक्रम राबविले तर शेतीचीही भरभराट व्हायला वेळ लागणार नाही. तसेच काही कमर्शिअल स्वरूपातही उपक्रम राबविता येतील. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
आज बागायती क्षेत्रातील बहुतांशी जमिनी क्षारपड होऊ लागल्या असून, पाणी व रासायनिक खतांच्या अतिवापराने त्यातून अन्नधान्याचे उत्पादनही कमी प्रमाणात येऊ लागले आहे. अशावेळी जमिनींचा पोत वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच पावले उचलायला हवीत, असे झाले तरच आपण भविष्यात येणारे संकट टाळू शकू,अन्यथा शेतकऱ्यांच्या भावी पिढ्या त्यांना माफ करणार नाहीत.
अन्नधान्यांमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचे प्रमाण वाढायला लागले असून, त्याचे दुष्परिणाम मानवाच्या शरीरावर दिसू लागले आहेत.
काही दिवसांत तयार होणाऱ्या पालेभाज्या तसेच फळांवर कीटकनाशकांचा वापर यांचा अतिरेकी वापर टाळायला हवा. तरच जमिनी सुस्थितीत राहिल. यासाठी सेंद्रिय शेतीची कास शेतकऱ्यांनी धरायला हवी, असे शेतीक्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. सेंद्रिय शेतीतील उत्पादनांमुळे पालेभाज्यांतील सत्व व्यवस्थित मिळत असल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. (प्रतिनिधी)