दराअभावी कांदा पुन्हा शिवारातल्या चाळीत!
By admin | Published: May 6, 2016 12:18 AM2016-05-06T00:18:59+5:302016-05-06T01:17:19+5:30
शेतकरी चिंतेत : दुष्काळात तेरावा महिना त्याप्रमाणे अवस्था; शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ जमेना
खटाव : एकीकडे दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकरी वर्गाला बिकट आर्थिक परिस्थिीला ही तोंड द्यावे लागत आहे. बाजारात कांद्याचे भाव वधारल्यानंतर बऱ्याच शेतकरी वर्गाने कांद्याची लागवड केली. कांद्याचे उत्पादनही वाढले; परंतु बाजारात कांद्याचे भाव उतरल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तर बहुतांश शेतकरी वर्गाने निघालेला कांदा चाळीत भरून ठेवला आहे.
कांदा हे पीक बागायती म्हणून ओळखले जाते. खटाव तालुक्यात बहुतांश शेतकरी कांद्याची लागवड करतात. कांदा लागवडी पासून ते त्याच्या काढणीपर्यंत शेतकरी वर्गाला येणारा खर्च पाहता आज कांद्याला बाजारात मिळणारा दर आणि झालेला खर्च यांचा ताळमेळ घातला तर शेतकरी वर्ग पुरता अडचणीत येत आहे. एक वेळ कांद्याचा उच्चांकी दर झाल्यानंतर पुन्हा कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी वर्गाने आता उत्पादित केलेला कांदा चाळीत भरण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन खर्च आणि विक्रीतून येणारी रक्कम पाहता झालेला खर्चही निघत नसल्यामुळे योग्य दर येईपर्यंत तो सुरक्षित कांदा चाळीत ठेवण्याचा निर्णय शेतकरी वर्गाने घेतला आहे.
रब्बी हंगामात ज्यांना पाण्याची सोय आहे त्या शेतकरी वर्गाने कांद्याची लागण केली आणि ज्याच्याकडे ती सोय नाही त्यांनी रब्बी ज्वारी, गव्हाचे उत्पादन केले; परंतु कांदा उत्पादन केलेल्या शेतकऱ्याला मात्र या उतरलेल्या दरामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
घरात असणाऱ्या दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे. सध्या तरी शेतकरी वर्गाने कांदाचाळीचा आधार घेऊन कांदा ठेवला आहे. आता त्याला प्रतीक्षा आहे, ती बाजारात दर वाढण्याची. (प्रतिनिधी)