जिजामाता बँकेमुळे चोरगेंची आत्महत्या

By admin | Published: December 4, 2015 11:20 PM2015-12-04T23:20:01+5:302015-12-05T00:22:23+5:30

पत्नीची फिर्याद : शिरीष कुलकर्णी व वर्षा माडगूळकर यांच्यावर गुन्हा

Chorgen's suicide due to Jijamata Bank | जिजामाता बँकेमुळे चोरगेंची आत्महत्या

जिजामाता बँकेमुळे चोरगेंची आत्महत्या

Next

सातारा : वखार व्यावसायिक रमेश बळीराम चोरगे यांनी जिजामाता सहकारी बँकेत अडकलेली रक्कम परत मिळत नसल्यानेच आत्महत्या केली असून, मृत्यूच्या काही क्षणांपूर्वीच रक्कम देण्यास नकार देणारे शिरीष कुलकर्णीच घटनेस कारणीभूत असल्याची फिर्याद चोरगे यांच्या पत्नीने दाखल केली आहे. दरम्यान, बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा माडगूळकर यांच्यावरही त्यांनी फसवणूकप्रकरणी ठपका ठेवला आहे.
रमेश चोरगे यांचा मृतदेह गुरुवारी रात्री आठच्या सुमारास राजधानी टॉवर्स या इमारतीजवळ आढळला होता. त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली असावी किंवा ते पडले असावेत, अशी शक्यता रात्रीच वर्तविण्यात येत होती. मात्र, पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नव्हता. रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या जिजामाता बँकेत चोरगे यांची ठेव होती, असेही बोलले जात होते. त्यांच्या पत्नी जयश्री यांनी शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीवरून या बाबींवर शिक्कामोर्तब झाले आहे. बँकेत पतीसोबत आपण पैसे मागण्यासाठी गुरुवारी गेलो होतो, तेव्हा शिरीष कुलकर्णी यांच्याशी चोरगे यांची बाचाबाची झाली होती. दोघे इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेले होते. तेथेही त्यांची भांडणे झाली. म्हणूनच पैसे मिळत नसल्याच्या नैराश्यातून चोरगे यांनी वरून उडी मारली, असे जयश्री यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी अवस्थेत चोरगे यांना रुग्णालयात नेत असताना त्यांनी मला शिरीष कुलकर्णी यांच्याबरोबर झालेले संभाषण सांगितले. ‘पैसे मिळणार नाहीत,’ असे कुलकर्णी यांनी सांगितल्यानेच आपण वरून उडी घेतली, असे पती मला म्हणाले होते. असा जबाब जयश्री चोरगे यांनी दिला आहे. दरम्यान, महिलांना अधिक व्याजदर देत असल्याचे सांगून एक लाख रुपये ठेव ठेवण्यास प्रवृत्त करणाऱ्या बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा माडगूळकर यांनी आपली फसवणूक केली, असेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
रमेश चोरगे यांच्या नावावर एक लाख रुपये ठेव ठेवली होती तर पत्नी जयश्री यांच्या नावावरही एक लाख रुपये ठेवले होते. त्यापैकी पत्नी जयश्री यांच्या नावावरील एक लाख रुपये बँकेने परत केले होते; परंतु चोरगे यांच्या नावावरील रक्कम परत मिळत नव्हती. मुलीचे लग्न करायचे असल्याने पैशांची गरज होती आणि म्हणूनच चोरगे तणावाखाली होते, असेही म्हटले आहे. (प्रतिनिधी)


जिन्यावरही बाचाबाची
आम्ही पैसे मागायला गेलो तेव्हा इतरही दोन-तीन ठेवीदार आले होते. कर्मचारी कुलकर्णी यांना भेटू देत नव्हते म्हणून आम्ही मागील बाजूने गेलो. कुलकर्णी हे त्यांच्या कार्यालयासमोरच भेटले. रमेश चोरगे यांनी पैशांची मागणी केली. त्यावेळी ‘पैसे देतो,’ असे सांगून चोरगे यांना घेऊन कुलकर्णी जिन्यातून वर गेले. जिन्यातही त्यांची बाचाबाची झाल्याचे मी ऐकले. नंतर मी इतर ठेवीदारांबरोबर बँकेच्या पुढील बाजूस जाऊ लागले. तेव्हा धपकन आवाज आला. आम्ही तिकडे पळत गेलो. तेव्हा जिन्याखाली चोरगे पडल्याचे दिसले, असे जयश्री चोरगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Chorgen's suicide due to Jijamata Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.