चौपाटी ‘गॅस’वर; जिभेचे चोचले महागणार!
By admin | Published: March 2, 2017 11:43 PM2017-03-02T23:43:52+5:302017-03-02T23:43:52+5:30
व्यवसायासाठी दीडशे रुपयांनी वाढ : अनुदान नाकारलेल्या ग्राहकांना ८६ रुपयांचा बोजा; शेवटी फटका सातारकरांना
सातारा : लादी पावात झालेल्या दरवाढीमुळे वडापाव, कच्छी दाबेली यासारख्या पदार्थांच्या किमतीत महिन्यापूर्वी वाढ झालेली असतानाच हॉटेल, हातगाडी धारकांना आणखी एक धक्का बसला आहे. व्यवसायासाठी वापरला जात असलेला १९ किलोचा गॅस सिलिंडर तब्बल १४९.५० पैशांनी महागला आहे. त्यामुळे त्याचा चटका खवय्ये ग्राहकांनाही सोसावा लागणार की काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार हजारो ग्राहकांनी गॅसवरील अनुदान प्रामाणिकपणे नाकारले. अशा विनाअनुदानित गॅस दरातही वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. त्यामुळे १४.३ किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरला आता ६९१ ऐवजी ७७७ रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये ८६ रुपयांची वाढ झाली असल्याने गृहिणींच्या बजेटवर परिणाम होणार आहे.
सातारा जिल्ह्यात खवय्येगिरींची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी चौकाचौकात वडापाव, सामोसेचे गाडे टाकले आहेत. यातील नव्वद टक्के गाड्यांवर व्यवसायासाठीच्या १९ किलो वजनाचा सिलिंडर वापरला जातो. हा सिलिंडर वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठाच दणका दिला आहे.
या सिलिंडरच्या दरात तब्बल १४९.५० पैशांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. त्यामुळे साहजिकच हॉटेल व्यावसायिक खाद्य पदार्थांच्या दरात वाढ करून ग्राहकांना झळ बसवू शकतात.
अनेकांच्या घरात गॅस गिझर आहे. त्यासाठी विनाअनुदानितचा गॅस वापरला जातो. तो महागल्यास गार पाण्यानेच अंघोळ करण्याची वेळ येणार आहे. गॅस सिलिंडरमधील दरवाढीमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे. (प्रतिनिधी)