नागरिकांनो, थोडा निर्धास्तपणा सोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:29 AM2021-06-01T04:29:24+5:302021-06-01T04:29:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांचा या प्रयत्नांना ...

Citizens, leave a little indifference! | नागरिकांनो, थोडा निर्धास्तपणा सोडा!

नागरिकांनो, थोडा निर्धास्तपणा सोडा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांचा या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. संचारबंदी असतानाही अनेक भाजीविक्रेते शहरात लपूनछपून विक्री करत आहेत. किराणा दुकाने बंद असली तरी घरातून किराणा देणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. नागरिकांना कोरोनाचे कोणतेही गांभीर्य नसल्याने अनेकजण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. रुग्णालय व मेडिकल वगळता सर्व अत्यावश्यक सेवादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. असे असताना नागरिकांसह छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून संचारबंदी नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. सातारा शहरातील गर्दी पाहिल्यानंतर संचारबंदी आहे किंवा नाही हेच समजत नाही.

भाजीविक्रीसाठी बंदी असताना शहरात दररोज मोठ्या प्रमाणात भाजी येत आहे. छोटे-मोठे विक्रेते सायकल, दुचाकी तर कोणी पिशवीमध्ये भाजी घेऊन त्याची विक्री करत आहे. किराणा दुकाने बंद असली तरी अनेक दुकानदार घरातून किराणा मालाची विक्री करत आहेत. जो तो अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर पडत आहे. पोलिसांकडून कारवाई करूनही शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही. कोरोनामुळे जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत भीषण होत असताना नागरिक मात्र प्रशासनाला सहकार्य करण्याचे सोडून नियमांचे उल्लंघन करत असताना दिसून येत आहेत. अशा नागरिकांवर आता प्रशासनालाच कठोर कारवाई करावी लागणार आहे.

(चौकट)

सुरक्षा महत्त्वाची की भाजी...

जिल्ह्यासह सातारा शहरात गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. अनेक कोरोनाबाधित रुग्ण औषध व रुग्णालयाच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत. अशा रुग्णांमुळे कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. भाजी व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना आपण कळत-नकळत कोणाच्या संपर्कात आलो याचा थोडाही मागमूस लागत नाही. त्यामुळे या कठीणकाळात भाजीपेक्षा सुरक्षा महत्त्वाची आहे, ही गोष्ट प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.

(चौकट)

पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्या वाहनधारकांवर सोमवारी पोलीस दलाकडून कारवाई करण्यात आली. पालिकेजवळील शाहू चौकात अनेक दुचाकी व चारचाकी गाड्यांची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात आली. या वेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे पाहून अनेक वाहनधारकांनी दुरूनच आपला मार्ग बदलला.

सर्व फोटो : जावेद खान

Web Title: Citizens, leave a little indifference!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.