इंधन बचतीला हातभार; 'या' शहरातील बहुतांशी नागरिक वापरतात अपारंपरिक ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 05:24 PM2021-11-19T17:24:31+5:302021-11-19T17:25:40+5:30
मलकापूर : शहरातील २ हजार ५० घरात सोलार बंबाचा वापर होत असून नागरिकांनी इंधन बचतीला चांगलाच हातभार लावला आहे. ...
मलकापूर : शहरातील २ हजार ५० घरात सोलार बंबाचा वापर होत असून नागरिकांनी इंधन बचतीला चांगलाच हातभार लावला आहे. अपारंपरिक ऊर्जा वापरातून वार्षिक ९ हजारांवर गॅस सिलिंडरची बचत होत आहे. त्यामुळे पाणी तापवण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची अप्रत्यक्षरीत्या बचत झाल्याने मोलाचा हातभार लागत आहे.
मलकापूर सोलार सिटी प्रकल्पाद्वारे शहरात जास्तीत जास्त सोलार ऊर्जेचा वापर करण्याचा पालिकेने प्रसार केला. प्रोत्साहन देण्यासाठी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ साली १ कोटी ८ लाखांचा निधी दिला होता. या निधीमधून तत्कालीन नगरपंचायतीने शासनाच्या सबसिडी बरोबरीने सूट देत पहिल्या टप्प्यातच सातशेपेक्षा जास्त घरांवर सोलार बंब बसवले. तर त्यापूर्वीच काही वैयक्तिक मिळकतदारांनी सोलार बंबाचा वापर सुरू केला होता. या सर्वांच्या अपारंपरिक ऊर्जा वापराने झालेले फायदे विचारात घेता व शासनाची सबसिडी, पालिकेच्या प्रोत्साहन अनुदानाचा फायदा घेण्यासाठी शहरातील इतर मिळकदारांनीही आपल्या घरावर सोलार बंब बसवले.
२०१८ अखेर २ हजार घरांवर सोलार बंबाचा वापर सुरू झाला. आजअखेर शहरात २ हजार ५० घरांत सोलार बंबाचा वापर होत असल्यामुळे इंधन बचतीला हातभार लागला आहे. नागरिकांकडून झालेल्या अपारंपरिक ऊर्जा वापरामुळे वार्षिक ९ हजारांवर गॅस सिलिंडरची बचत होत आहे. पाणी तापवण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत झाल्याने पर्यावरण संवर्धन होण्यास मदत झाली आहे.
सोलार बंबावरील अनुदान सुरू करावे!
इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर सौर ऊर्जाचा वापर उत्तम नमुने होऊ शकतात. यासाठी प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. शासनाने सोलार बंबाचे अनुदान अचानक बंद केले. तर निधीअभावी पालिकेचेही प्रोत्साहन अनुदान बंद झाले. त्यामुळे सोलार बंब बसवणारांची संख्या मंदावली. सर्वत्र सोलर उपकरणांचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शासन व पालिकेने प्रोत्साहन अनुदान सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.