तहसील कार्यालयात नागरिकांनी कोणत्याही कामासाठी येऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:10+5:302021-05-25T04:44:10+5:30
रामापूर : पाटण तालुक्याच्या ठिकाणी मुलाच्या प्रवेश, शिधापत्रिका याबरोबर शासकीय कामानिमित्ताने तालुक्यातील नागरिकांच्यासोबत पुणे, मुंबई येथील नागरिक पाटण ...
रामापूर : पाटण तालुक्याच्या ठिकाणी मुलाच्या प्रवेश, शिधापत्रिका याबरोबर शासकीय कामानिमित्ताने तालुक्यातील नागरिकांच्यासोबत पुणे, मुंबई येथील नागरिक पाटण तहसीलदार कार्यालयात गर्दी करत आहेत. ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे कारण होऊ नये म्हणून शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तालुक्यातील बाहेरून मुंबई, पुणे येथून आलेल्यांना आणि स्थानिक नागरिकांनी २५ मे ते १ जून या कालावधीत कार्यालयात कोणत्याही कामासाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व साखळी खंडित करण्यासाठी तालुक्यातील महसूल, आरोग्य आणि पोलीस प्रशासन अथक परिश्रम करूनही शंभर टक्के यश येत नाही. तालुक्यातील नागरिक विविध कारणे प्रशासनाची दिशाभूल करून शासकीय कार्यालयात गर्दी करत आहेत. ही गर्दी अजून कोरोनावाढीचे कारण ठरू नये. म्हणून तालुक्यातील महसूल प्रशासनातील अधिकारी यांनी ही गर्दी कमी करण्यासाठी २५ मे ते १ जून या काळात कोणतेही नागरिकांचे समक्ष काम केले जाणार नाही. ज्याचे कुणाचे काम आहे त्यांनी tahsilpatan@gmail.com वर मेल अर्ज करावेत. अर्ज ऑनलाइन करावेत. असे प्रत्यक्षात न येता अर्जानुसार कामे केली जातील, असे सोशल मीडियाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे.