लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांची त्रेधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:42+5:302021-04-16T04:39:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम काही दिवसांपासून हाती घेण्यात आली. मात्र, अपुऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम काही दिवसांपासून हाती घेण्यात आली. मात्र, अपुऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे नागरिकांची त्रेधा सुरू असल्याचे चित्र आहे. तसेच लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे.
प्रशासनाने याबाबत योग्य त्या सूचना नागरिकांना देणे आवश्यक आहे. लोकं लसीकरणासाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र, केंद्रांवर लस मिळत नसल्याने त्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. कोरोना काळात शासनाने रस्त्यावर फिरण्यास बंदी घातलेली असताना वयस्कर नागरिकांना लसीकरणासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शहरातील लसीकरण केंद्रावर दहा वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात होते. मात्र, लोक सकाळी सात वाजल्यापासूनच केंद्रांवर गर्दी करत आहेत. मोजक्याच लोकांना लसीकरण केले जात असल्याने जे लोक उन्हामध्ये रांगेत उभे राहतात, त्यापैकी अनेकांना घरी परत पाठवले जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच परिस्थिती दिसते.
लसीकरणासाठी होत असलेल्या गर्दीमुळेही कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून नोंदणी केलेल्या लोकांना नेमकी केव्हा लस दिली जाणार, तेवढ्याच लोकांना केंद्रावर बोलवावे तरच लसीकरण केंद्रावर होणारी रोजची गर्दी टाळता येणार आहे.
दुसऱ्या बाजूला जिल्ह्याला लसींचा मुबलक पुरवठा कधी होणार, याबाबत शासनाने एकदा जाहीर करावे, म्हणजे यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल तसेच लसींचा योग्य पुरवठा केला गेल्यास ही मोहीम निर्विघ्न आणि सुलभतेने पूर्ण करता येऊ शकेल. शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
शहरामध्ये दोन लसीकरण केंद्र आहेत. शहराची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात आहे. अशा परिस्थितीत सर्वच लोकांना लसीकरण करायचे म्हटले तर दोन केंद्रांवर गर्दी होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे प्रशासनाने ही शासकीय केंद्र वाढवावीत अन्यथा या केंद्रांवर जो सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो आहे, तो कायमच पाहायला मिळणार आहे.
कोट..
लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या लोकांनाच लस देण्यात येते. तरीदेखील लोक सकाळपासून मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. लसींचा तुटवडा असल्याने आलेल्या सर्व लोकांना लसीकरण करणे अवघड आहे, त्यामुळे लोकांनी नोंदणी केल्याशिवाय लसीकरण केंद्रावर येऊ नये.
- अभिजित बापट
मुख्याधिकारी, सातारा
फोटो ओळ : सातारा शहरातील कस्तुरबा रुग्णालयातील लसीकरण केंद्राबाहेर उन्हामध्ये गुरुवारी नागरिकांची अशी रांग लागली होती.
===Photopath===
150421\img-20210415-wa0005.jpg
===Caption===
फोटो ओळ : सातारा शहरातील कस्तुरबा रुग्णालयातील बसिकरण केंद्रावरच्या बाहेर उन्हामध्ये गुरुवारी नागरिकांची अशी रांग लागली होती.