अतिवृष्टीनंतर निसर्गाच्या प्रकोपाने अंगावर येतोय शहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:26+5:302021-07-28T04:40:26+5:30

कुडाळ : जावळी तालुक्यातील जोरदार अतिवृष्टीमुळे केळघर आणि परिसरात अक्षरशः निसर्गाचा प्रकोप झाला. रस्ते, पूल वाहून गेले. ओढ्यांचे नैसर्गिक ...

The city is coming under the influence of nature after heavy rains | अतिवृष्टीनंतर निसर्गाच्या प्रकोपाने अंगावर येतोय शहारा

अतिवृष्टीनंतर निसर्गाच्या प्रकोपाने अंगावर येतोय शहारा

Next

कुडाळ : जावळी तालुक्यातील जोरदार अतिवृष्टीमुळे केळघर आणि परिसरात अक्षरशः निसर्गाचा प्रकोप झाला. रस्ते, पूल वाहून गेले. ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाहच बदलले. भातशेती नावापुरतीच राहिली. डोंगरदऱ्यांतून धो-धो कोसळत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने सारेच वाहून नेले. असं आक्रित कवा घडलंच नाही, असा वरुणराजाचा प्रकोप झाला. केळघरच्या रावजीबुआ पुलावरूनही पाणी गेलं अन वेण्णामाईचा रौद्रभीषण अवतार बघून जावळीकरांच्या काळजात अगदी धस्स झालं.

जावळी तालुक्यातील पाचजण या निसर्गाच्या विळख्यात सापडले. पावसात घराची वाट धरली असताना ओढा ओलांडतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. रेंगडीवाडी या छोट्याशा गावातील सहदेव कासुर्डे यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांसह तिघाजणांना जीव गमवावा लागला. मुंबईहून भातलावणीसाठी आलेल्या रवींद्रची आईवडिलांसोबत शेवटचीच भातलावण ठरली. आई भागाबाई, वडील सहदेव आणि चुलती तानाबाई यांच्यासह ओढा ओलांडताना रवींद्रही पुराच्या पाण्यात वाहून गेला.

ही घटना समजल्यावर सारा गाव सुन्न झाला. गुरुवारचा दिवस रेंगडीकरांना नव्हे तर संपूर्ण जावळीकरांसाठी काळरात्रच बनून आला होता. अस काही आक्रित घडेल असे वाटलेही नाही. पावसाने हाहाकार केला होता. चार दिवस मृतदेहांची शोधाशोध अखेर सोमवारी (दि. २६) रवींद्रचा मृतदेह हाती लागला आणि थांबली. या काळात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, सागर धनावडे, नाना जांभळे, शिवेंद्रसिंहराजे मित्रसमूह भागातील युवावर्ग, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्याधिकारी भगवान मोहिते, आदींनी प्रयत्नांची शिकस्त करीत लोकांना धीर देत मदत केली. या भीषण काळात संकटाचा सामना करण्यासाठी समस्त जावळीकर एकवटले आणि माणुसकी जोपासत त्यांनी सामाजिकतेचे दर्शन घडविले.

पावसाळा सुरू झाला की भातलागणीची भागात लगबग सुरू होते. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सारेच हवालदिल झाले होते. लोकांचीही भातलागणीची कामे नुकतीच सुरू झाली होती. अशातच गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार माजविला. दोन-तीन दिवस एवढा काय वरुणराजा बरसला की आजवर असा कधी कोसळलाच नाही! यातच हसत्या-खेळत्या कासुर्डे कुटुंबाची वाताहत झाली. घरातील दोन कर्त्या पुरुषांचा पुरात अंत झाला. सारे कुटुंब उद्विग्न होऊन गेले. वयाच्या अवघ्या तिशीतला रवींद्र हरपला. घरातील तीन लहान मुली, पत्नी अजूनही रवींद्रच्या येण्याची आस लावून बसली होती. भाऊ गणेश पुरता कोसळला.

चौकट

निसर्गाने साथ सोडली तरी माणुसकी जिवंत

निसर्गाच्या रुद्रावताराचा या कुटुंबाला फार मोठा फटका बसला. जावळीकरांची माणुसकी, सामाजिकता या साऱ्यांना धीर देण्यासाठी पुढे सरसावली. अनेक मदतीचे हात पुढे आले. पूरग्रस्तांना मदतीसाठी माणुसकीचा हात मिळाला.

Web Title: The city is coming under the influence of nature after heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.