कऱ्हाडात शहर विकास आघाडी रिंगणात

By admin | Published: October 3, 2016 12:27 AM2016-10-03T00:27:57+5:302016-10-03T00:27:57+5:30

विलासराव पाटील-उंडाळकर : पारदर्शी कारभारासाठी स्वच्छ प्रतिनिधी पाठवा

City Development League in Karhad | कऱ्हाडात शहर विकास आघाडी रिंगणात

कऱ्हाडात शहर विकास आघाडी रिंगणात

Next

कऱ्हाड : ‘येत्या नगरपालिका निवडणुकीत कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडी रिंगणात उतरणार असून, पालिकेच्या पारदर्शी कारभारासाठी चांगले प्रतिनिधी तेथे पाठविण्याचा आमचा मानस आहे. ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्या सर्वांना आमची दारे खुली असून जात, पात न पाहता तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी देणार आहे,’ असे मत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड येथे आघाडीची घोषणा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अशोक भोसले, कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक मजहर कागदी, सचिव माजी नगरसेविका सावित्री मुठेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब मोहिते, प्रकाश जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात कऱ्हाड शहराचा समावेश झाल्यानंतर पाच वर्षे आमदार म्हणून शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्या पद्धतीने मी भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला; पण यशवंतराव चव्हाणांचा वारसा आणि चांगली संस्कृती असणाऱ्या शहराचे सामाजिक स्वास्थ्य आज बिघडलेले आहे. नकारात्मक विचारसरणीच्या विकासात्मक आघाड्या शहरात काम करीत असून, त्यामुळेच आज शहराच्या विकासाचे चित्र धुसर दिसत आहे. त्यामुळे कऱ्हाड शहर नगरविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. फक्त या निवडणुका खुल्या वातावरणात, धनशक्तीला न जुमानता झाल्या पाहिजेत, ही अपेक्षा आहे. म्हणूनच दसऱ्याच्या मुहूर्तावर याची मुद्दाम घोषणा केली आहे. आघाडीचा स्वतंत्र जाहीरनामा योग्यवेळी लोकांपर्यंत पोहोचवू.’
अशोक भोसले म्हणाले, ‘कऱ्हाड शहराची अवस्था आज बकाल झाली आहे. याला सत्ताधाऱ्यांचा गलथान कारभार कारणीभूत आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. विलासराव पाटील यांनी पार्ले येथे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पंचवीस एकर जागा पालिकेला मिळवून दिली; पण काही राजकीय मंडळींनी त्याला विरोध केल्याने कचऱ्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. पालिकेच्या वतीने मंडई परिसरात दुकान गाळे बांधण्यात आले. मात्र, त्या दुकान गाळ्या पुढील अतिक्रमणे काढण्यापूर्वीच त्याचे लिलाव करण्यात आले. वेळेत अतिक्रमण न निघाल्याने पालिकेचे उत्पन्न घटले. याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. कऱ्हाड शहराची हद्दवाढीचे श्रेय कोणीही घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी उंडाळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पालिकेत आणून हा प्रश्न मांडला होता. (प्रतिनिधी)
थांबा आणि पाहा..!
तालुक्यातील आपल्या राजकीय आघाडीप्रमाणे शहराच्या तुमच्या या आघाडीत कोण-कोण समाविष्ट होणार, याबाबत उंडाळकरांना छेडले असता, ‘बरेच लोक येणार आहेत. सगळे पत्ते आत्ता ओपन करता येणार नाहीत. जरा सबुरीने घ्या. थांबा आणि पाहा. सर्व चित्र स्पष्ट होईल,’ असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले.
 

Web Title: City Development League in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.