सातारा शहराला वादळी वाऱ्यासह पावासाने झोडपले, तुफान पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:03 PM2020-05-15T12:03:03+5:302020-05-15T12:05:31+5:30
सातारा शहराला गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. या पावसामुळे हवेतील उकाडा काही प्रमाणात कमी झाला. जिल्ह्याच्या विविध भागात झाडावरील आंबे झडून पडले. तर अनेक फळभाज्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सातारा : सातारा शहराला गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. या पावसामुळे हवेतील उकाडा काही प्रमाणात कमी झाला. जिल्ह्याच्या विविध भागात झाडावरील आंबे झडून पडले. तर अनेक फळभाज्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
गेल्या काही दिवसांपासून हवेत उकाडा वाढला होता. या वातावरणात कुठल्याही वेळी वळवाचा पाऊस कोसळू शकतो असे अंदाज बांधले जात होते. आभाळ भरुन येत होते परंतु पावसाने हुलकावणी दिली होती. गुरुवारी मात्र सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवला.
वाराही वेगाने वाहत राहिला. दुपारनंतर आकाशात काळे ढग गोळा झाले. सोसाट्याचा वारा सुटला आणि सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रस्त्यावर स्मशान शांतता पसरलेली असतानाच पावसाने अचानक हजेरी लावून नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला. शहरातील प्रत्येक गल्लीत बच्चे कंपनी नाचत बागडत पावसात भिजताना पाहायला मिळत होती. सुमारे तासभर पडलेल्या या पावसात मुलांसोबत मोठ्या माणसांनीही भिजण्याचा आनंद घेतला.
शहरातील समर्थ मंदिर, राजवाडा, मोती चौक, राधिका चौक, पोवई नाका, राजपथ, शाहू चौक, सदरबझार, मध्यवर्ती बस स्थानक, सुभाषचंद्र चौक या भागात रस्ता मोकळा असल्याने अनेक जण पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी रस्त्यावर आलेले पाहायला मिळाले. कोरोनाची दहशत मोडून काढत लोकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
शहरात बंदोबस्तासाठी सज्ज असलेल्या पोलिसांची पावसामुळे पळापळ झाली. तर जीवनावश्यक वस्तू भाजा खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या सातारकरांना धावतच घर गाठावे लागले.
या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले उताराचा रस्त्यावरून पाणी वेगाने वाहताना दिसत होते तर सखल भागांमध्ये पाणी साठले. जिल्ह्यात विविध ठिकाणी गारांचा पाऊस झाला असल्याने आंबा, द्राक्ष या फळांसोबतच शेतातील टोमॅटो, काकडी, दोडका, कार्ली, या पिकांचे तसेच केळी, पपईच्या भागांचे मोठे नुकसान झाले आहे.
वीज गायब
पावसाने हजेरी लावतात शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडत असल्याने विभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरातील वीजपुरवठा खंडित केला.