शहरातील कचरा बनतोय डोकेदुखी
By admin | Published: October 26, 2014 09:11 PM2014-10-26T21:11:51+5:302014-10-26T23:30:32+5:30
सातारकर हैराण : दीपावलीतच साचला शहरातील रस्त्यांवर शेकडो टन कचरा--निवडणूक झाली आता कामाचं बोला
सातारा : दीपावलीचा उत्सव चारच दिवसांत संपला आणि शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा येऊन साचला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शेकडो टन कचरा येऊन पडला आहे. यामध्ये फटाक्यांचे कागद आणि प्लास्टिकचा समावेश आहे. त्यातच गेले दोन सातारा शहर आणि परिसरात हलक्या सरी कोसळत असल्यामुळे गारवा जाणवू लागल्याने सातारकर चांगलेच हैराण झाले असतानाच रस्त्यावर अनेक ठिकाणी साचून राहिलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.
दीपावलीनिमित्त साताऱ्यातील अनेक रस्ते गेले काही दिवस गर्दीने फुलले होते. याच काळात अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर दुकानेही टाकली होती. या कालावधीत झालेला कचरा अजूनही दूर झालेला नाही. तो तसाच रस्त्यावर पडून राहिल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावरून येणारे-जाणारे पादचारी मात्र नाकाला रुमाल लावूनच जात आहेत.
यशवंतराव चव्हाण यांचा पोवई नाक्यावर पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या बाजूलाच नेहमी कचरा टाकला जातो. या अनुषंगाने अनेकदा तक्रारी झाल्यानंतरही त्याकडे सातारा नगरपालिका कधी गांभीर्याने पाहत असल्याचे ऐकिवात नाही. दीपावलीच्या कालावधीत अनेक फूल विक्रेते येथे बसतात; मात्र तेही येथेच कचरा करून जातात. पालिका कर्मचाऱ्यांनी वारंवार या मंडळींना सूचना केल्यानंतरही कोणत्याही उपाययोजना आखल्या जात नाहीत.
बसस्थानक परिसरालगतच सकाळी सहा ते नऊ या वेळेत मंडई भरते. येथे ग्रामीण भागातून शेतकरी आपला माल विकण्यासाठी येतात. ताजा भाजीपाला मिळत असल्याचे सातारकरांची येथे खरेदीसाठी गर्दी असते. मात्र, अनेक शेतकरी मंडईची वेळ संपली की राहिलेला खराब माल आणि उर्वरित कचरा बाजूलाच उचलून टाकतात. मात्र, याचा सर्वात मोठा फटका बसस्थानक येणाऱ्या प्रवाशांना बसतो कारण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. (प्रतिनिधी)