वीर धरण पुनर्वसित गावांना नागरी सुविधा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:24+5:302021-07-17T04:29:24+5:30
खंडाळा : वीर धरणाच्या स्थापनेपासून पुनर्वसित गावांना अद्यापही काही नागरी सुविधांचा अभाव आहे. या प्रकल्पग्रस्त लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी ...
खंडाळा : वीर धरणाच्या स्थापनेपासून पुनर्वसित गावांना अद्यापही काही नागरी सुविधांचा अभाव आहे. या प्रकल्पग्रस्त लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी त्यांना मूलभूत अठरा नागरी सुविधा पुरविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, यासाठी खंडाळा तहसीलदार यांच्याकडून आढावा घेण्यात आला.
खंडाळा तालुक्यातील तोंडल, लोणी, भोळी, भादे, शिरवळ, विंग, वाठार बुद्रूक या वीर धरणातील पुनर्वसित गावांना शासनाच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात विंधन विहिरी, कूपनलिका, पिण्याच्या पाण्याची सोय, मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण, गटारे सुविधा, पथदिवे पुरवठा, माध्यमिक व प्राथमिक शाळा इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक यासाठी जागा, सार्वजनिक शौचालय, प्रसाधनगृहे, खेळाचे मैदान, स्मशानभूमी शेड व रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर, बसथांबे, गावठाण विस्तार, गुरांसाठी तळे, क्रीडांगण, पीक मळणी जमीन, शेतजमिनीकडे जाणारे रस्ते या सुविधा पुरविण्यासाठी आढावा घेण्यात आला. यामध्ये गावात सध्या असलेल्या सुविधा व करावयाच्या आवश्यक सुविधा याबाबत माहिती घेण्यात आली.
या पुनर्वसित गावामध्ये नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या गावातील समस्या समजून घेण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते मिलिंद पाटील, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज पवार, तहसीलदार दशरथ काळे, बांधकाम उपअभियंता एस.डी. हेळकर, पुनर्वसन उपअभियंता नवनाथ केंजळे यांसह सर्व गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.
.............................................