नागरिक व वन विभागामध्ये संघर्ष अटळ !

By admin | Published: September 28, 2016 12:10 AM2016-09-28T00:10:51+5:302016-09-28T00:23:48+5:30

महाबळेश्वर टोल एकत्रिकरण : टोलविरोधी कृती समितीची स्थापना

Civil and forest division conflict inevitably! | नागरिक व वन विभागामध्ये संघर्ष अटळ !

नागरिक व वन विभागामध्ये संघर्ष अटळ !

Next

महाबळेश्वर : महाबळेश्वर टोल एकत्रिकरणाला विरोध करण्यासाठी टोलविरोधी कृती समिती स्थापन करून न्यायालयीन लढा उभारण्याबरोबरच गावाने तीव्र आंदोलनाची तयारी करण्याचा निर्णय नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे भविष्यात नागरिक व वन विभाग यांच्यातील संघर्ष आता अटळ मानला जात आहे.
नगरपालिकेसह व स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही जिल्हा प्रशासनाने पालिका व वन विभागाच्या टोलनाक्यांचे एकत्रिकरणाचा चंग बांधला असून, वन विभागाने येथे त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. वन विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाबळेश्वरात तळ ठोकला असून, कोणत्याही क्षणी वन विभाग एकत्रित टोल वसुली सुरू करणार असल्याचे दिसत आहे. अनेकवेळा विरोध करूनही वन विभाग पालिकेच्या व नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावात वन विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र असंतोष पसरला आहे. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी या संदर्भात विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी नागरिकांची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला १९ पैकी १६ नगरसेवक उपस्थित होते. तर माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे, अर्बन बँकेचे संचालक समीर सुतार, सी. डी. बावळेकर, लीलाताई शिंदे, रमेश शिंदे, अनंत पारठे, अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल, रामचंद्र हिरवे, अशोक शिंदे, गणेश दगडे, गोविंद कदम, संदीप आखाडे, अमित ढेबे, हिरो शेख आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. टोल घेण्यास पालिकेचा विरोध नव्हता व पुढेही राहणार नाही. दोन वर्षांपूर्वीच एकत्रित टोल वसुली करण्यासाठी पालिकेने सर्वानुमते ठराव करून सहमती दर्शविली आहे. परंतु वन विभागाने पाच रुपये वसूल करण्यास होकार दिला होता; परंतु पालिकेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून वन विभागाने पंधरा रुपये वसूल करण्याची तयारी सुरू केली. याला पालिकेचा विरोध आहे. वन विभागाला जर पालिकेचे म्हणणे पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही एका पॉइंटवर एकत्रित टोल वसूल करावा. पालिकेच्या वेण्णा लेक येथील टोलनाक्यावरच वसुली करण्याचा हट्ट वन विभागाने करून गावाला वेठीस धरू नये. गावाच्या सहनशीलतेचा अंत वन विभागाने पाहू नये, असा सज्जड इशाराही मंगळवारी झालेल्या सभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी दिला.
जर वन विभागाने आपली भूमिका बदलली नाही तर लोकशाही व सदनशीर मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय ही मंगळवारी झालेल्या नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनासंदर्भात निवेदन संबंधित विभागाच्या सर्व सक्षम अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नागरिक आणि वन विभाग यांच्यात संघर्ष रंगणार असे चिन्ह आहेत. (प्रतिनिधी)

वन विभागाचा उंट गावच्या तंबूत शिरतोय!
टोल एकत्रिकरणाच्या नावाखाली वन विभागाचा उंट गावाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. उद्या काळ सोकावण्याचा धोका शहरासमोर उभा ठाकला आहे. हा धोका नागरिकांनी ओळखला पाहिजे नाही तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही, अशा संतप्त भावनाही काही नागरिकांनी व्यक्त केल्या. आज टोलनाक्यावर अधिकार दाखवतील, उद्या ते पालिकेच्या इमारतीही वन विभागाच्या मालकीची असल्याचा दावा करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. तेव्हा हा टोल एकत्रिकरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गावाने एक व्हावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.

Web Title: Civil and forest division conflict inevitably!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.