‘सिव्हिल’चे ५६ वर्षांपासून फायर ऑडिटच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:39 AM2021-01-13T05:39:29+5:302021-01-13T05:39:29+5:30
सातारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बाल शिशु वॉर्डात घडलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा मुद्दा समोर ...
सातारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बाल शिशु वॉर्डात घडलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा मुद्दा समोर आला. या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात काय परिस्थिती आहे, याची माहिती घेतली असता, तीन महिन्यांपूर्वीच रुग्णालयामध्ये आग प्रतिबंधात्मक यंत्रणा बसवली गेली आहे. मात्र, रुग्णालयाच्या स्थापनेपासून तब्बल ५६ वर्षे रुग्णालयाचे फायर ऑडिटच झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
जिल्हा शासकीय रुग्णालयाची इमारत १९६४ मध्ये बांधण्यात आली आहे. त्यावेळी फायर ऑडिट सक्तीचे नव्हते. आता या इमारतीचे शासनाच्या निर्देशानुसार जर फायर ऑडिट करायचे असेल, तर इमारतीमध्ये पाण्याच्या नळ्या नेण्यासाठी इमारतीची तोडफोड करावी लागणार आहे. ही तोडफोड टाळण्यासाठी आजपर्यंत कोणत्याच जिल्हा शल्यचिकित्सकांनी फायर ऑडिट केले नाही. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गत सहा महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर, पहिल्यांदा रुग्णालयात आग प्रतिबंधात्मक यंत्रणा त्यांनी बसवली. परंतु ही यंत्रणा कितपत तग धरेल, याची शाश्वती नाही. डॉ. चव्हाण यांनी भंडारा येथील घटनेनंतर रुग्णालयाचे रितसर फायर ऑडिट करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केलेत. हे ऑडिट पालिकेतील फायर स्टेशन ऑफिसर करतात. मात्र, पालिकेत हे पद नसल्यामुळे शासनमान्य फायर सर्व्हिसेसकडून सेफ्टी फायर ऑडिट जिल्हा रुग्णालयाला करून घ्यावे लागणार आहे. त्यांच्या निर्देशानुसार आग प्रतिबंधात्मक यंत्रणेतील त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत. त्यानंतर पालिकेच्या अग्निशामक विभागाला ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागणार. त्यानंतर शहानिशा करून पालिकेकडून रुग्णालयाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा कालावधी जाणार आहे.
चौकट :
२१ रुग्णाले अन् ५ शाळांकडे नाहरकत प्रमाणपत्र
साताऱ्यातील बऱ्याच खासगी रुग्णालयांचेही फायर ऑडिट झाले नाही. परंतु २१ रुग्णालयांचे आणि ५ शाळांचे फायर ऑडिट झाले आहे. यातील काहींचे केवळ कागदोपत्री ऑडिट पूर्ण झाले आहे. मात्र, सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.
चौकट :
ऑडिटमध्ये काय पाहिलं जातं...
१) फायर हायड्रॅन्ट सिस्टिम
२) फायर अलार्म सिस्टीम
३) फायर एक्सटींगविशर,
४) धूर डिटेक्टर
५) हीट डिटेक्टर
६) इमारतीचा ओपन जिना
७) बाहेरच्या बाजूला उघडणारा दरवाजा
८) पाण्याची सुसज्ज यंत्रणा
चौकट :
झेडपीचं ऑडिट म्हणे कागदोपत्री!
जिल्हा परिषदेचं फायर ऑडिट एका शासनमान्य संस्थेकडून करण्यात आलं आहे. या संस्थेने झेडपीला काही उपाययोजना सुचवल्या आहेत. मात्र, त्या केवळ कागदावरच असल्याचे फायर ऑडिट करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. केवळ कागदोपत्री ऑडिट पूर्ण करून चालणार नाही, तर आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी म्हणून याकडे पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कोट :
रुग्णालयाचे यापूर्वी कधीही फायर ऑडिट झाले नाही. मात्र, रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वीच आग प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनाही योग्य ते प्रशिक्षण दिलं जात आहे. फायर ऑडिट करण्यासाठी एका शासनमान्य संस्थेशी बोलणी सुरू असून, लवकरच रुग्णालयाचे फायर ऑडिट केले जाणार आहे.
- डॉ. सुभाष चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा