महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटांत हाणामारी, चौघे ताब्यात; साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: December 27, 2023 03:44 PM2023-12-27T15:44:28+5:302023-12-27T15:52:51+5:30
सातारा : येथील जिल्हा न्यायालयाच्या मुख्य रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ...
सातारा : येथील जिल्हा न्यायालयाच्या मुख्य रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चार तरुणांना ताब्यात घेतले. हा प्रकार बुधवारी दुपारी दीड वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महाविद्यालय सुटल्यानंतर काही मुले चालत सहकार न्यायालयाच्या समोरील रस्त्यावरून जात होती. त्यावेळी काही मुले पाठीमागून आली. या मुलांनी पुढे गेलेल्या मुलांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले. भर रस्त्यातच मारामारीचा प्रकार सुरू होता. काहींनी या प्रकाराचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या वादावादीची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस आल्याचे समजताच काही तरुण पसार झाले तर चार तरुणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची पोलिसांकडून कसून चाैकशी सुरू होती. कोणत्या कारणातून हा वाद झाला, हे अद्याप समोर आले नाही. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.
सातत्याने होतायत वाद
महाविद्यालयीन मुलांमध्ये दोन गटांत सातत्याने वाद होत आहेत. काही दिवसांपूर्वी बस स्थानक परिसरातही अशाच प्रकारे वाद झाला होता. मात्र, मुलांनी आपापसात हा वाद मिटविल्यामुळे पोलिसांपर्यंत पोहोचला नाही. अलीकडे महाविद्यालयीन मुलांमध्ये टोळीयुद्ध घडत असून, पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.