खंडेराजुरीत हाणामारी; सहाजणांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: February 21, 2016 11:59 PM2016-02-21T23:59:14+5:302016-02-21T23:59:14+5:30
दोन गटांतील वाद : द्राक्ष बागेतील खांब फोडल्याचे कारण
मिरज : तालुक्यातील खंडेराजुरीत द्राक्षबागेतील खांब फोडल्याच्या कारणावरून दोन गटांतील हाणामारीत एकाचा दात पाडण्यात आला. याप्रकरणी पोलिसांत परस्परविरोधात फिर्याद देण्यात आली असून, दोन्ही गटांच्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हणमंत गवळी हे जेसीबीने द्राक्ष बागेत सपाटीकरण करीत असताना शेजारी श्रीपाल माणगावकर यांच्या बागेतील खांबाचे नुकसान झाल्याच्या कारणावरून मारामारी झाली. याबाबत पांडुरंग गवळी याने हाताचा चावा घेऊन दगड मारून दात पाडल्याची व साथीदारांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार सचिन माणगावकर याने केली आहे.
याप्रकरणी पांडुरंग गवळी, हणमंत गवळी, शंकर गवळी, अमृत गवळी, अविनाश गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग गवळी यांनी, श्रीपाल माणगावकर यांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.