Satara: कऱ्हाडात वर्चस्ववादातून दोन गटांत राडा, पोलिस ठाण्यात गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:48 IST2025-02-08T13:47:34+5:302025-02-08T13:48:08+5:30
जमावाकडून दगडफेक; बीअर बारची तोडफोड

Satara: कऱ्हाडात वर्चस्ववादातून दोन गटांत राडा, पोलिस ठाण्यात गोंधळ
कऱ्हाड : सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या कारणावरून कऱ्हाडात गुरुवारी वर्चस्ववादाची ठिणगी पडली. कार्वे नाक्यावर एका गटाकडून युवकाला बेदम मारहाण करण्यात आली, तर त्याचा राग मनात धरून दुसऱ्या गटातील युवकांनी जोरदार दगडफेक करीत बारची तोडफोड केली, तसेच पोलिस ठाण्यासमोरही गोंधळ घातला.
या घटनेने कार्वे नाका, कोल्हापूर नाका परिसरासह शहरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने कऱ्हाडला भेट देऊन कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला. शहरातील चौकाचौकांत, तसेच घटनास्थळ परिसरात सशस्त्र पोलिस नेमण्यात आले आहेत.
अबरार कोकणे (वय २२, रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड), असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गत काही वर्षांपासून शहरातील टोळीयुद्ध शमले असले तरी अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. त्यातच गुरुवारी शहरातील एका युवकाने सोशल मीडियावर ‘किंग ऑफ कऱ्हाड’ अशी वर्चस्वाबाबतची पोस्ट टाकली. त्या पोस्टवर विरोधी ‘कमेंट’ करण्यात आल्या. त्यामुळे युवकांच्या गटामध्ये शाब्दिक चकमक झाली. शहरातील युवकांनी सायंकाळच्या सुमारास मुजावर कॉलनीतील अबरार कोकणे या युवकाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो युवक गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलवले, तर मारहाण करणारे युवक तेथून पसार झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुजावर कॉलनीतील युवकांचा जमाव जमला. ते सर्व युवक जमावाने कोल्हापूर नाक्यावरील एकाच्या बीअर बारसमोर गेले. त्याठिकाणी शिवीगाळ करीत त्यांनी जोरदार दगडफेक केली. त्यामध्ये बारच्या काचा फुटल्या, तसेच मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तोडफोड करणारे तेथून पसार झाले होते. घटनेनंतर शहरातील मंडई परिसरासह मुजावर कॉलनी, कार्वे नाका, मार्केट यार्ड, कोल्हापूर नाका परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांकडून संशयितांची धरपकड
वर्चस्ववादातून घडलेल्या या दोन्ही घटनांच्या फिर्यादी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात सुरू होते. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत आठ ते दहा युवकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती.
सीसीटीव्ही फुटेज तपासले
कऱ्हाड शहर पोलिसांनी मारहाण, तसेच तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये काही युवकांची ओळख पटली असून, पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तसेच बारमध्येही ठसेतज्ज्ञांकडून ठशांची तपासणी करण्यात आली.