जमिनीतून रस्ता नेण्यावरून खेड नांदगिरीत तुंबळ हाणामारी
By दीपक शिंदे | Published: May 10, 2023 01:51 PM2023-05-10T13:51:07+5:302023-05-10T13:51:54+5:30
कोरेगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी
कोरेगाव : खेड नांदगिरी येथे जमिनीतून रस्ता नेण्याच्या कारणावरून दोन कुटुंबामध्ये व त्यांच्या नातेवाइकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
तेजस उदयसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी ११ ला सुमारास खेड नांदगिरी येथील झरा शिवार नावाच्या शिवारामध्ये जमीन गट क्रमांक ६८४ मध्ये तहसीलदारांच्या आदेशाने अडथळा काढण्यासाठी मंडल अधिकारी, तलाठी व पोलिस पाटील यांच्यामार्फत बंदोबस्तात कार्यवाही सुरू होती.
यावेळी बबन गणपत कदम, प्रफुल्ल गणपत कदम, राजेंद्र दशरथ कदम यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कार्यवाहीदरम्यान अर्जुन विनायक कदम, कमलसिंग विनायक कदम, वैभव अर्जुन कदम, सागर सत्यवान कदम यांनी आम्ही आता उभ्या पिकातून जेसीबी घालून रस्ता बनवणार आहे, असे सांगितले.
त्यावेळी तेजस कदम, राजेंद्र दशरथ कदम, सारंग रामचंद्र कदम, शारदा प्रफुल्ल कदम यांनी उभ्या पिकातून जेसीबी घालायचा नाही, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून शिवीगाळ, दमदाटी करत धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपस्थित पोलिसांसह महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भांडणे सोडविली. अर्जुन विनायक कदम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तहसीलदारांच्या आदेशाने रस्त्याच्या कब्जेपट्टीच्या अंमलबजावणीचे काम सुरू असताना आमच्या कुटुंबातील लोक व नातेवाईक जमा झालो होतो. कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शेतामध्ये जात असताना तेजस उदयसिंह कदम, विठ्ठल प्रफुल्ल कदम, संदीप चंद्रकांत कदम, सारंगनाथ रामचंद्र कदम, रोहित रवींद्र कदम, सचिन बबन कदम, बबन गणपती कदम, रवींद्र रामचंद्र कदम, प्रफुल गणपत कदम व शुभम सुरेश गोळे यांनी आम्ही तुम्हाला येथून जाऊन देणार नाही तसेच तुम्ही आमच्या शेतात पाय ठेवला तर हात-पाय काढून तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी शिवीगाळ करत धमकी देऊन अर्जुन विनायक कदम, सागर सत्यवान कदम, प्रतीक कमलसिंग कदम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून कोरेगाव पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.