ssc exam: महाविद्यालयाची कवाडे खुली करणारी परीक्षा उद्यापासून, शिक्षण विभाग सज्ज
By प्रगती पाटील | Published: February 29, 2024 07:21 PM2024-02-29T19:21:12+5:302024-02-29T19:25:25+5:30
सातारा जिल्ह्यातील ३७ हजार विद्यार्थी सज्ज
सातारा : महाविद्यालयीन प्रवेशाची कवाडे खुली करणारी दहावीची परीक्षा शुक्रवार दिनांक एक मार्चपासून सुरू होत आहे. सातारा जिल्ह्यातील ११६ परीक्षा केंद्रातून ३७ हजार ६५८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात १५ परिरक्षक केंद्रे असून एकही परीक्षा केंद्रे उपद्रवी नाही.
सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांमध्ये १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. शाळेतील सुमारे ३७ हजार ६५८ विद्यार्थी यासाठी प्रविष्ट आहेत. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रशासन आग्रही असून त्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा काळात कोणीही कॉपी करणार नाही यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सापडलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची कोणत्याही कारणांनी गय केली जाणार नसल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
परीक्षा केंद्राजवळ जमावबंदी
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांजवळ फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. केंद्राजवळ जमावबंदीचा आदेश लागू केल्याने कोणीही फिरताना आढळून आल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. याबरोबरच केंद्रा जवळील झेरॉक्स दुकान, कॉम्प्युटर सेंटर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने संबंधित दुकानदारांना देण्यात आले आहेत.
अशी आहेत भरारी पथके
बोर्डा मार्फत जिल्हास्तरीय नियुक्त भरारी पथके प्रत्येक तालुक्यात ठेवण्यात आली आहेत. एक तहसीलदार, गटविकास अधिकारी, एक गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक केंद्रावर एक बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभाग प्रमुखांचे प्रत्येक तालुक्यात एक पथक तैनात राहणार आहे.
परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित नको
जिल्ह्यातील दहावीची परीक्षा सुरू होत असताना परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अडचण होईल असे कृत्य होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात साताऱ्याचा पारा भलताच वाढल्याने परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना उकडण्याचीही शक्यता आहे. यावरही आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.
दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात तणावमुक्त वातावरण असावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रांवर उपस्थित रहावे आणि तणाव मुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे. - प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक