स्वच्छ-सुंदर सातारा निव्वळ घंटागाडीच्या गाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:15+5:302021-07-03T04:24:15+5:30

सातारा : शहराची हद्दवाढ झाल्यानंतर नव्याने शहरात समाविष्ट झालेल्या शाहूनगरमध्ये घंटागाडी मुख्य रस्त्यावरूनच जात असल्याने स्थानिकांची अडचण होत आहे. ...

Clean-beautiful Satara in the song of the net bell train | स्वच्छ-सुंदर सातारा निव्वळ घंटागाडीच्या गाण्यातच

स्वच्छ-सुंदर सातारा निव्वळ घंटागाडीच्या गाण्यातच

Next

सातारा : शहराची हद्दवाढ झाल्यानंतर नव्याने शहरात समाविष्ट झालेल्या शाहूनगरमध्ये घंटागाडी मुख्य रस्त्यावरूनच जात असल्याने स्थानिकांची अडचण होत आहे. त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर सातारा हे निव्वळ घंटागाडीवर गाणं वाजविण्यापुरतंच राहिल्याची भावना रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

भल्या सकाळी शहरातून कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीचा दिवस अगदी सकाळी ६ पासून सुरू होतो. गेल्या काही दिवसांपासून घंटागाडीवर कोविडचे प्रबोधनगीत वाजवले जाते. या गीताचे बोल कानी पडले की सातारकर घरातील कचरा घंटागाडीत टाकायला म्हणून बाहेर पडतात. काही महिन्यांपूर्वी शहरात शाहूनगरचा समावेश करण्यात आला. त्रिशंकू असलेल्या शाहूनगर परिसरात पूर्वी कॉलनीतील रहिवाशांनी स्वखर्चाने कचरा गोळा करण्यासाठी गाडी लावली होती. प्रत्येक घरातून महिन्याला तीस ते पन्नास रुपये देऊन हा कचरा गोळा केला जात होता. पालिका हद्दीत आल्यानंतर मात्र खाजगी घंटागाड्या बंद करण्यात आल्या. संपूर्ण शाहूगनरमध्ये एकच गाडी असल्याने ही घंटागाडी निव्वळ मुख्य रस्त्यावरच उभं राहून स्वच्छ सातारा सुंदर सातारा हे गाणं ऐकवते. त्यामुळे अंतर्गत सोसायटीतील नागरिक मुख्य रस्त्यावर येऊन कचरा टाकेपर्यंत गाडी निघून जात असल्याचे सत्र सुरू झाले आहे. परिणामी नागरिकांच्या घरातच कचरा साठू लागला आहे.

शाहूनगर येथून सातारा शहरात येण्यासाठी अनेकजण चार भिंतीच्या रस्त्याने ये-जा करतात. उच्चविद्याविभूषित आणि महागड्या गाड्यांतून येणारे अनेक जण चार भिंतीसमोरच कचरागाडीतून फेकत असल्याने तिथेही घाणीचे साम्राज्य साठले आहे. घरात कचरा साठवून ठेवून त्यावर बसणाऱ्या चिलटांचा त्रास नको म्हणून हा मार्ग निवडला जात असल्याचे स्थानिक सांगतात. मात्र यामुळे स्वच्छ साताराची घोषणा प्रत्यक्षात उतरत नाही. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चौकट :

पूर्वी ७० आता २०० ची मागणी !

नगरपालिका हद्दीत शाहूनगर परिसर नसल्याने पूर्वी येथे सोसायट्यांनी एकत्र येऊन घंटागाडी सुरू केली होती. प्रत्येक सदस्याकडून ७० रूपये पूर्वी घेतले जायचे आणि जवळपास प्रत्येक घरासमोर ही गाडी थांबायची. पालिका हद्दीत शाहूनगर समाविष्ट झाल्यानंतर मात्र या घंटागाडीचाही दर वाढला. आता एका कुटुंबाकडून महिन्याला निव्वळ कचरा उचलून नेण्यासाठी दोनशे रुपये मागितले जात आहेत.

कोट :

दिवसभर कामाच्या निमित्ताने आम्ही घराबाहेर असतो. त्यामुळे सकाळी घंटागाडी आली नाही तर कचरा तसाच घरात साठून राहतो. चार-पाच दिवस कचरा घरात राहिला की त्यात आळ्या होतायत. या आळ्या स्वयंपाकघरातही येऊ लागल्यात. त्यामुळे घंटागाडीची वेळ आणि शुल्क यावर पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे.

- अ‍ॅड. चैत्रा व्ही. एस. शाहूनगर

...............

Web Title: Clean-beautiful Satara in the song of the net bell train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.