‘स्वच्छ वाई’ अभियान यशस्वी करणार
By Admin | Published: September 30, 2015 10:15 PM2015-09-30T22:15:14+5:302015-10-01T00:33:57+5:30
आशा राऊत : २ आॅक्टोबरला शासनाचा हागणदारीमुक्ती उद्दिष्ठपूर्तीचा संकल्प
वाई : ‘स्वच्छ भारत’ अभियानअंतर्गत राज्य शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्ठानुसार वाई शहर गांधी जयंतीपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार वाई नगरपालिकेने केला असून, सर्वांच्या सहकार्ऱ्यानेच यशस्वी करणार,’ असे आश्वासन वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आशा राऊत यांनी दिले.शहरातील सामाजिक संस्था, संघटना यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या़ यावेळी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, उपनगराध्यक्षा सुरेखा जाधव, प्रशासन अधिकारी प्रदीप शिंदे, नगरसेवक दत्तात्रय खरात, शोभा शिंदे, उद्योजक दीपक ओसवाल, रोटरी क्लब डॉ़ नितीन कदम, असंघटित महिला संघटनेच्या अध्यक्षा उषा ढवण, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र झगडे, पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष रामदास राऊत, समूह संस्थेचे प्रतिनिधी मंदार सोनपाटकी, जनविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती़राऊत म्हणाल्या, ‘शासनाने स्वच्छ भारत अभियानअंतर्गत वाई पालिकेची निवड केली असून, शासनाचे आव्हान पालिकेने स्वीकारले आहे. पालिकेने त्यादृष्ठीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे़ वाई शहरात ३० टक्के कुटुंबांकडे शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यासाठी ही ठोस उपाययोजना करण्यात आली आहे़ यासाठी पालिकेकडून दहा हजार व शासनाकडून बारा हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार
आहे.
शासनाकडून १३५ कुटुंबांना अर्थिक सहाय्य मंजूर झाले आहे़ पालिकेकडून ‘गुड मॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले असून, आत्तापर्यंत ४५ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे़ ’ (प्रतिनिधी)
नगसेवकांनी फिरविली पाठ
सध्या केंद्र व राज्य शासनाने ‘स्वच्छ भारत’ अभियान युद्धपातळीवर सुरू असून, त्यामध्ये वाई पालिका सहभागी आहे़ पालिकेच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील सामाजिक संस्था, विविध संघटना, व्यापारी वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत; परंतु या बैठकीस पालिकेचे बहुतांश नगसेवकांनी पाट फिरविल्याचे चित्र पाहावयास मिळाले़
गुजरातच्या सेप्ट युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात दोन हजार कुटुंबांना स्वत:चे शौचालय नाही़ शहरात प्लास्टिकची, ओला-सुक्याची कचऱ्याची विल्हेवाट या समस्या गंभीर असून, स्वच्छ सुंदर वाई शहर स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी नागरिकांचे सकारात्मक सहकार्य अपेक्षित आहे. कारण नागरिकांची मानसिकता बदलल्याशिवाय अभियान यशस्वी होणार नाही.
- भूषण गायकवाड,
नगराध्यक्ष, वाई