साताऱ्यातील तरुणाईकडून अजिंक्यताऱ्याची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 01:14 PM2020-10-31T13:14:19+5:302020-10-31T13:15:32+5:30
Swachh Bharat Abhiyan, Fort, Satara area सातारा म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! गडांवरचे हे अराजक दूर करण्याचा निश्चय साताऱ्यातील तरुणाईने केला आणि २९ ऑक्टोबर या एकाच दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.
सातारा : सातारा म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! या वीरभूमीची शान असलेल्या जिल्ह्यात असंख्य किल्ले उभे राहिले. इतिहासातील अनेक गोष्टींची साक्ष असलेला हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र, आज या साऱ्या ठेव्याला घाण, कचऱ्याचा वेढा पडला आहे. गडांवरचे हे अराजक दूर करण्याचा निश्चय साताऱ्यातील तरुणाईने केला आणि २९ ऑक्टोबर या एकाच दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.
अनेक युवकांनी या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना किल्ल्यावरील भाग वाटून दिले. प्रत्येकाने वाटून दिलेल्या भागाची स्वच्छता केली. किल्ल्यावर चार ते पाच तास झालेल्या या साफसफाईत प्लास्टिकच्या पिशव्या, पाकिटे, बाटल्या गोळा करण्यात आल्या.
किल्ल्यावर दोन ते तीन पोती कचरा जमा करण्यात आला. हा कचरा गोळा करण्यात युवक पुढाकार घेत असताना तो करण्यातही गडावर जाणारे तरुणच आघाडीवर असल्याची खंत प्रिया तोरस्कर हिने व्यक्त केली. शिवप्रेमाने भारावलेल्या तरुणाईच्या या उपक्रमाचे साताऱ्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या मोहिमेत प्रिया तोरस्कर, तेजस सुपेकर, अभिजीत सुर्वे, प्रणाली ढवळे यांनी सहभाग घेतला होता.