कऱ्हाडला प्रीतीसंगम घाटाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:22+5:302021-07-28T04:40:22+5:30
शहरासह तालुक्यात २१ ते २४ जुलै यादरम्यान पडलेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. सलग चार दिवस ...
शहरासह तालुक्यात २१ ते २४ जुलै यादरम्यान पडलेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. सलग चार दिवस पावसाने उसंत न घेतल्यामुळे कृष्णा, कोयना नदीपात्राची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यातच कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे अनेक गावांना महापुराच्या पाण्याने वेढा दिला. कऱ्हाड शहरातील दीडशे कुटुंबांसह अन्य गावातील पूररेषेतील कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतरीत केले होते. शुक्रवारी नदीकाठच्या बहुतांश गावांमध्ये पुराच्या पाण्याने शिरकाव केला; तसेच तालुक्यातील कोयना, वांग, दक्षिण मांड, उत्तर मांड नद्यांवर असलेले पूलही पाण्याखाली गेले.
कऱ्हाड शहरातील पाटण कॉलनीसह प्रीतीसंगम घाटावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले होते. हा विळखा आणखी घट्ट होण्याची शक्यता असतानाच शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला. धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे नद्यांचे पाणीही ओसरले. शनिवारी शहरातील शाहू चौक, पाटण कॉलनी, प्रीतीसंगम घाटावरील पुराचे पाणी कमी झाले. रविवारी संपूर्ण परिसर रिकामा झाला; मात्र पुराच्या पाण्यामुळे प्रीतीसंगम घाटावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे पालिकेने घाटावरील चिखल हटविण्याचे काम हाती घेतले आहे.
- चौकट
स्थलांतरीत कुटुंबांच्या घराचीही स्वच्छता
कऱ्हाड शहरातील पाटण कॉलनीसह अन्य काही ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेने स्थलांतरीत केले होते. नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर संबंधित कुटुंबांच्या घरामध्ये पुराचे पाणी गेले होते. सध्या पूर ओसरला असून, स्थलांतरीत कुटुंबे आपापल्या घरी परतली आहेत. त्यांच्याकडूनही घरांची स्वच्छता केली जात आहे.
फोटो : २७केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडातील प्रीतीसंगम घाटावरील चिखल हटविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.