महिलांकडून विल्सन पॉइंटची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:03+5:302021-07-16T04:27:03+5:30
महाबळेश्वर : सूर्योदय, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेल्या पर्यटकांसह स्थानिकांच्या पसंतीच्या विल्सन पॉइंट येथे दारूच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, कागदाचे रॅपर यांमुळे ...
महाबळेश्वर : सूर्योदय, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेल्या पर्यटकांसह स्थानिकांच्या पसंतीच्या विल्सन पॉइंट येथे दारूच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, कागदाचे रॅपर यांमुळे पॉइंट परिसर अस्वच्छ झाला होता. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे पाहून सेवाकार्यात अग्रेसर असलेल्या स्थानिक महिलांनी विल्सन पॉइंट परिसराची स्वयंस्फूर्तीने स्वच्छता करून परिसर स्वच्छ केला.
महाबळेश्वर बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला विल्सन हा पॉइंट असून, पर्यटकांसह अनेक स्थानिक या भागामध्ये मॉर्निंग-इव्हिनिंग वॉकसाठी येतात. येथील थंड हवा, धुके अन् सूर्योदय-सूर्यास्ताचे विहंगम दृश्य मन मोहून टाकते. सायंकाळचे धुंद वातावरण मनाला प्रसन्नता देते. मात्र, या पॉइंटला अनेक तळिरामांची नजर लागली असून, येथे संध्याकाळी बसणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक तरुणाईने या पॉइंटला दारूचा अड्डा बनविला असून, येथे मॉर्निंग-इव्हिनिंग वॉकसाठी येणाऱ्या अनेकांना याचा त्रास होतो. दारू रिचविणाऱ्यांकडून बाटल्या फोडून तेथेच काचांचा खच पडलेला दिसतो. यासोबतच बिअरच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बॉटल्स, खाद्यपदार्थांची पाकिटे असा अनेक प्रकारचा कचरा येथे टाकला जातो. यामुळे निसर्गरम्य विल्सन पॉइंट व परिसरात बकाल, अस्वच्छता दिसत होती. हे पाहून येथील सेवाकार्यात अग्रेसर असलेल्या राधा मुक्कावार, सपना अरोरा, अदिती भांगडिया, ज्योती पल्लोड, वंदना पल्लोड यांच्यासह रितिका नायडू, साक्षी नायडू, लक्ष्मी येरलगद्दा, दीपा मार्तंड या महिलांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता केली.