शासनाच्या स्वच्छता स्पर्धेतून प्रभाग लखपती मलकापुरात आनंदोत्सव : प्रभाग क्रमांक चार प्रथम; पंधरा लाखांचे बक्षीस पटकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:02 AM2018-05-01T01:02:57+5:302018-05-01T01:02:57+5:30
मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या वतीने नुकतीच स्वच्छ प्रभाग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतून प्रभाग क्रमांक चारने स्वच्छतेचे प्रभावीपणे काम करत प्रथम क्रमांक पटकवला. त्यांना पंधरा लाखांचे बक्षीस मिळाले आहे.
मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या वतीने नुकतीच स्वच्छ प्रभाग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतून प्रभाग क्रमांक चारने स्वच्छतेचे प्रभावीपणे काम करत प्रथम क्रमांक पटकवला. त्यांना पंधरा लाखांचे बक्षीस मिळाले आहे. त्याचबरोबर प्रभाग तीन, एकने अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवत दहा व पाच लाखांची बक्षीस मिळवली आहेत.
तर प्रभाग दोनने उत्तेजनार्थ अडीच लाखांचे बक्षीस मिळवले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
मलकापूर नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभाग घेत प्रभावी काम केले आहे. विविध उपक्रम राबवत प्रत्येक घरातील महिलांकडून स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. स्वच्छतेसाठी ‘मी तयार आहे’ या ब्रँडची दररोज दारादारात रांगोळी काढत हा ब्रँड तळागाळात पोहोचवला. मलकापूरला देशातील पहिल्या पंचवीस शहरांत आणण्यासाठी घरोघरी स्वच्छतेचाच सारिपाठ वाचला गेला. तसेच स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी राज्यशासनाच्या निर्देशनानुसार शहरात स्वच्छ प्रभाग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शहरातील चारही प्रभागांनी सहभाग घेतला.
चार शाळांना एक लाखाचे बक्षीस
स्वच्छ प्रभाग स्पर्धेंतर्गत स्वच्छ शाळा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रभाग एकमधील नूतन प्राथमिक शाळा आगाशिवनगर, प्रभाग चारमधील जिल्हापरिषद शाळा लक्ष्मीनगर, प्रभाग तीनमधील आगाशिवनगर जिल्हापरिषद शाळा क्रमांक दोन व प्रभाग दोनमधील जिल्हापरिषद शाळा शास्त्रीनगर या चार शाळांनी स्वच्छतेचे चांगले काम केले. त्यांनी प्रथम क्रमांक मिळवत प्रत्येकी १ लाखाचे बक्षीस मिळवले आहे.
एका अंगणवाडीला बक्षीस
स्वच्छ प्रभाग स्पर्धांतर्गत स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा घेण्यात आली. प्रथम क्रमांकाला पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामध्ये शहरातील २२ अंगणवाड्यांमधून प्रभाग चारमधील अंगणवाडी क्रमांक १३८ ने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पन्नास हजारांचे बक्षीस मिळवले आहे.
तीन शाळांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार
या स्पर्धेत प्रभागनिहाय परंतु स्वच्छतेबाबत प्रभावीपणे काम करणाऱ्या द्वितीय क्रमांकास पंच्याहत्तर हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामध्ये जिल्हापरिषद शाळा शिंदेमळा, आगाशिवनगर जिल्हापरिषद शाळा क्रमांक एक व जिल्हापरिषद शाळा माळीनगर या तीन शाळांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांनी प्रत्येकी ७५ हजारांचे बक्षीस मिळवले आहे.
महिलांनी मिळविली पन्नास बक्षिसे
मलकापूर नगपंचायतीने गुरुवारी स्वच्छ प्रभाग स्पर्धेचे बक्षीस वितरण व महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या महिला मेळाव्यास उपस्थित महिलांसाठी प्रवेश कूपन देऊन लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉमध्ये पैठणी साड्या, नथ, पर्स, इजी मॉप, सोलर कंदील व लेडीज सायकल अशी पन्नास बक्षिसे लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात आली.