कृषी विभागातील लिपिक सामूहिक रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:43 AM2021-09-22T04:43:56+5:302021-09-22T04:43:56+5:30
सातारा : जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांची वर्ग केलेली सेवा रद्द करण्यात आली ...
सातारा : जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांची वर्ग केलेली सेवा रद्द करण्यात आली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ लिपिकांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी जिल्ह्यातील लिपिक कर्मचारी साताऱ्यात एकत्र आले होते.
याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यात लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांची ८९ पदे मंजूर आहेत. त्यामधील ४९ पदे भरलेली असून, ४० रिक्त आहेत. त्यानुसार उपविभाग, तालुकास्तरीय सर्व कार्यालयांत ५० टक्क्यांहून लिपिक पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने यामधील काही कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयातील कामासाठी घेतले आहे. अतिवृष्टीच्या कामासाठी घेतले असतानाही त्यांना विविध प्रकारची कामे लावण्यात येत आहेत. याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचा निषेध कर्मचाऱ्यांनी केला. त्यासाठी २० दिवसांपूर्वी दोन दिवस लिपिक कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले; तर त्यानंतर सामूहिक रजा आंदोलन केले. त्यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर काही दिवस आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत यावर निर्णय न झाल्याने मंगळवारपासून कृषी लिपिक पुन्हा सामूहिक रजेवर गेले आहेत.
मंगळवारी साताऱ्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर हे सर्व लिपिक एकत्र आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश मागे घ्यावा, याबाबत पुन्हा एकदा मागणी केली आहे.
फोटो दि.२१सातारा कृषी फोटो...
फोटो ओळ : सातारा येथे नवीन प्रशासकीय इमारतीसमोर कृषी विभागातील लिपिक एकत्र आले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश रद्द करावा, अशी मागणी केली. (छाया : नितीन काळेल)
................................................................