वाई तहसील कार्यालयातील लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:35 AM2019-12-19T10:35:14+5:302019-12-19T10:36:24+5:30
अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जप्त केलेला डंपर सोडविण्यासाठी व आकारलेला दंड कमी करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना वाई तहसील कार्यालयातील गौणखनिज विभागाच्या लिपिकास लाचलुचतपच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी वाई तहसील कार्यालयात करण्यात आली.
सातारा : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जप्त केलेला डंपर सोडविण्यासाठी व आकारलेला दंड कमी करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना वाई तहसील कार्यालयातील गौणखनिज विभागाच्या लिपिकास लाचलुचतपच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी वाई तहसील कार्यालयात करण्यात आली.
राजू माणिकराव शेडमाके (वय ३३, रा. धोम कॉलनी, सोनगिरवाडी, ता. वाई. मुळ रा.नांदेड) असे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्या लिपिकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,संबंधित तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचा डंपर महसूल विभागाने केलेल्या कारवाईत जप्त करून वाई तहसील कार्यालयात नेण्यात आला होता. डंपरचा दंड कमी करून सोडून देण्यासाठी वाई तहसील कार्यालयातील लिपिक राजू शेडमाके याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीनंतर पाच हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, संबंधित तक्रारदाराने दि. १७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील (एसीबी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस नाईक वैभव गोसावी, सुप्रिया कादबाने, प्रशांत वाळके यांनी वाई तहसील कार्यालयासमोर सापळा लावला .
यावेळी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना शेडमाकेला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शेडमाके याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.