जिल्ह्यात बंद संमिश्र
By admin | Published: June 6, 2017 12:23 AM2017-06-06T00:23:18+5:302017-06-06T00:23:18+5:30
जिल्ह्यात बंद संमिश्र
सातारा : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील व्यवहार शेतकऱ्यांनी पूर्णपणे बंद केले असले तरी शहरातील बाजारपेठा थोड्याफार प्रमाणात सुरू होत्या. दरम्यान, काही ठिकाणांची जाळपोळ वगळता बंद शांततेत पार पडला.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, फलटण, वाई, कोरेगाव, वडूज अन् म्हसवड यासारख्या मोठ्या गावांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. साताऱ्यात कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दूध दिले, तर दहिवडीत शेतकऱ्यांनी शेकडो लिटर दूध रस्त्यावर सांडले. यामुळे अनेक ठिकाणी ‘भाज्यांचा सडा.. दुधाचा राडा’ दिसून आला.
पुणे-बंगलोर हाय-वे"वरील उडतारे गावाजवळ हिंसक वळण लागले. टायर अन् इतर वस्तू जाळून वाहने रोखण्यात आली. तसेच राष्ट्रवादीचे दोन आमदार शशिकांत शिंदे अन् मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही काढण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या. यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली.
दरम्यान, आपल्या न्याय मागण्यांसाठी पहिल्यांदाच संपाचे शस्त्र उगारणाऱ्या पोशिंद्याच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा संकल्प सातारा शहरातील बहुतांश नागरिकरांनी केला. ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्यानंतर व्यावसायिकांनी या बंदला संमिश्र पाठिंबा दिला.
मात्र, ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती, त्यांना गांधीगिरी करीत दुधाचे वाटप करून संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले. सोमवारी बाजारपेठ भलतीच सुस्तावली होती. कपड्यांची दुकाने बंद होती. अत्यावश्यक सेवेत येणारे मेडिकलही सकाळी दुपारी सुरु झाले. काही मिठाई आणि बेकरी दुकानांचे अर्धे शटर उघडले होते. त्यातून अत्यावश्यक वस्तू खरेदी करताना सातारकर दिसत होते. पेट्रोल पंप चालकांनी लोखंडी बॅरेकेटस आणि दगडांच्या मदतीने सर्व वाहनांसाठी प्रवेश निषिध्द केला होता.
गांधी मैदानापासून शेतकरी संघटनेने मोर्चा काढून दुकान सुरू असलेल्या व्यावसायिकांना संपास पाठिंबा देण्याची विनंती केली. तसेच शेतकरी संघटनेने मोर्चामध्ये आणलेल्या दुधाच्या किटल्यांतून दुकान सुरू असलेल्या व्यावसायिकांना दूध देवून संपास पाठिंबा देण्याचे आवाहन केले. हा मोर्चा गांधी मैदान पासून खालच्या रस्त्यामार्गे पोवईनाका पर्यंत काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटना आणि पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.