फलटणमध्ये बंद तर खंडाळ्यात महामार्ग रोखला

By admin | Published: April 1, 2015 10:57 PM2015-04-01T22:57:42+5:302015-04-02T00:41:52+5:30

संतप्त रामराजे समर्थक रस्त्यावर उतरले; बसच्या काचा फोडल्या

Close the highway and stop the highway in the Khandh | फलटणमध्ये बंद तर खंडाळ्यात महामार्ग रोखला

फलटणमध्ये बंद तर खंडाळ्यात महामार्ग रोखला

Next

फलटण : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजेसमर्थकांनी फलटण बंद पुकारला होता. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला. दरम्यान, या बंदवेळी एका बसच्या काचा फोडल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
खासदार उदयनराजे भोसले व रामराजे यांच्यात सध्या वाक्युद्ध सुरू आहे. त्यातूनच मंगळवारी साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी रामराजे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. रामराजेंबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. याचे पडसाद फलटण शहरात उमटले. शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील सर्व दुकाने बंद होती. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, सोमाशेठ जाधव, नितीन भोसले, किशोर पवार, फिरोज आतार, जालिंदर जाधव, सुनील मठपती, आशिष अहिवळे आदी सहभागी झाले होते. दरम्यान, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बारामती पुलावर कॅनॉलजवळ भगवानगड-कोल्हापूर ही बस (एमएच १४ बीटी ३५५२) अज्ञात तिघांनी थांबविली. त्यानंतर या बसच्या काचा लाकडी दांडक्याने फोडण्यात आल्या. त्यानंतर संशयित पळून गेले. फलटण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. हवालदार ठाकूर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)


प्रवाशांचे हाल...
बुधवारी दिवसभर फलटण शहरात बंद पाळण्यात आला. यामुळे नागरिकांचे हाल झाले तसेच जनजीवनही ठप्प झाले. रिक्षा बंद असल्याने प्रवशांचे हाल झाले. त्यांना पायी जाणे भाग पडले. भाजीविक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांचे नुकसान झाले.


उदयनराजे समर्थकांनी टायर पेटवून केला निषेध
खंडाळा : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुध्द केलेल्या वक्तव्याचे पडसाद बुधवारी खंडळ्यातही उमटले. रामराजेंच्या वक्तव्याचा निषेध करीत उदयनराजे समर्थकांनी राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, खंडाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आठ जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणी उदयनराजे समर्थकांकडून असे काही होईल, हे माहीत नसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. फलटणमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी पाणीवाटपाचा मुद्दा घेऊन रामराजेंवर टीकेची झोड उठविली होती. विधानपरिषदेच्या सभापतिपदावर विराजमान झाल्यानंतर रामराजेंनी या टीकेचा खरपूस समाचार घेत उदयनराजेंविरुद्ध भडक विधाने केली, त्यामुळे दोन राजेंमधील शाब्दिक चकमकीचा वाद कार्यकर्त्यांच्या रूपाने रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
केसुर्डी फाट्याजवळ महामार्गावर उदयनराजे समर्थक व शिवप्रताप माथाडी कामगार युनियनच्या कार्यकर्त्यांनी टायर पेटवून रास्ता रोको केला.
याप्रकरणी पोलिसांनी शिवप्रताप युनियनचे लोणंद विभागप्रमुख किसन बोडरे, रणजित माने, सतीश मोटे, रियाज शेख, अनिल व्हटकर, सादिक शेख, विशाल ढमाळ, तेजस गाढवे या आठजणांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. (प्रतिनिधी)


पोलिसांची धावपळ
उदयनराजे समर्थकांनी महामार्गावर टायर पेटविल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. या मार्गावरून पालकमंत्री विजय शिवतारे जाणार असल्याने जळलेले टायर ताबडतोब विझवून बाजूला करण्यात आले. खंडाळा रेस्क्यू टीमने मदत केली. शिरवळ ते खंडाळा अशा फेऱ्या चालू करून पाहणी करण्यात आली.

Web Title: Close the highway and stop the highway in the Khandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.