विडीकाडी ‘क्लोज’; टपरीत मटका ‘ओपन’!

By Admin | Published: January 17, 2017 12:44 AM2017-01-17T00:44:28+5:302017-01-17T00:44:28+5:30

पान शॉपमध्ये फक्त आकड्यांचा खेळ : कऱ्हाडच्या मटका बाजारात दररोज लाखोंची उलाढाल; राजरोस रंगतोय बुकींचा डाव

Close 'Videos'; 'Open' in the middle! | विडीकाडी ‘क्लोज’; टपरीत मटका ‘ओपन’!

विडीकाडी ‘क्लोज’; टपरीत मटका ‘ओपन’!

googlenewsNext



कऱ्हाड : शहरातल्या बहुतांश पानपट्ट्यांमध्ये एकवेळ ‘पान’ मिळायचे नाही; पण ‘चिठ्ठी’ हमखास मिळेल. मुळात पानसुपारीसाठी त्या टपऱ्या चालतच नाहीत. फक्त आकड्याच्या खेळासाठीच त्या ‘फेमस’ झाल्यात. कधी-कधी बुकींवर पोलिसांकडून कारवाई होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच मटका पुन्हा ‘ओपन’ होतो. सध्या शहरातील हा आकड्यांचा खेळ दिवसाकाठी लाखोंवर पोहोचलाय. मात्र, या व्यवसायाच्या मुसक्या आवळण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याचे दिसते.
आभाळच फाटलं तर ठिगळ कुठं लावायचं, असा प्रश्न पडतो. कऱ्हाड शहर पोलिसांचीही सध्या हीच अवस्था आहे. शहरात सर्वकाही आलबेल असल्याचे दिसतंय; पण दारू, मटका आणि वडापवाल्यांनी शहराला जेरीस आणलंय. शहरात मटका चालत नसल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश पानटपऱ्यांमध्ये मटका चालत असल्याचं दिसतं. यापूर्वी शहरात मटक्याचे मोठे वलय होते. मात्र, त्यावेळी शहर पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेत ‘खंबीर’ अधिकारी कार्यरत असल्याने त्यांनी काही प्रमाणात बुकींच्या मुसक्या आवळल्या होत्या. कारवाईच्या सत्रामुळे त्यावेळी बुकींचे धाबेही दणाणले होते. त्यातूनच मटक्यालाही काही अंशी आळा बसला होता.
मात्र, त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात रूजू झालेल्या अधिकाऱ्यांनी याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. त्यामुळे मटकाबाजार पुन्हा फोफावला. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांचे मटका व त्याअनुषंगाने होणाऱ्या अवैध धंद्यांकडे कानाडोळा झाला आहे. शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कऱ्हाड शहर पोलिसांची ‘खास’ पथके आहेत. मात्र, या पथकांकडूनही मटका दुर्लक्षित असल्याचे दिसते. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा अवैध दारूविक्री अथवा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून १०० ते २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईची कागदपत्रे तयार करण्यासाठी पेनही झिजले आहेत. मात्र, लाखोंची उलाढाल होणाऱ्या मटका व्यवसायाविरोधात गुन्हे शाखाही कडक धोरण अवलंबताना दिसत नाही.
तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी मटक्याविरोधात सातत्यपूर्ण कारवाईची गरज आहे.
पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी वारुंजीसह विमानतळ परिसरात मटका अड्ड्यांवर छापे टाकले होते. मात्र, त्यानंतर हे पथक थंडावले. पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने बुकीही चेकाळले. अनेक पान शॉपमध्ये आकड्याचा हा खेळ पुन्हा रंगला. मध्यंतरीच्या कालावधीत उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकासह शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मटक्याच्या किरकोळ ‘रेड’ केल्या.
मात्र, या कारवाईने मटका बाजार उद्ध्वस्त होणारच नव्हता. उलट काही बुकी ‘आत’ गेल्याने उरलेल्यांची चंगळ झाली. त्यांनी पूर्वीपेक्षा अधिक जोमाने या व्यवसायात लक्ष
घातले. गेल्या काही महिन्यांत शहरातील बहुतांश पानपट्ट्यांवर बिनदिक्कतपणे आकडे घेतले जातायत. वास्तविक, विडी-काडीही न मिळणाऱ्या रस्त्याकडेच्या या रिकाम्या खोक्यांमध्ये पानपट्टी नेमकी चालते कशी, हे पोलिसांनी पाहणे गरजेचे आहे. मात्र, पोलिसही अशा रिकाम्या खोक्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने बुकींना मोकळे रान मिळाले आहे.
कधी-कधी पोलिस पथकाकडून बुकींना चाप लावला जातो. मात्र, त्यात सातत्य नसते. मटक्याविरोधात कडक धोरण अवलंबले जात नाही. त्यामुळे कारवाईनंतर काही दिवसांतच हा व्यवसाय पुन्हा डोके वर काढतो. सातत्य नसल्यानेच सध्या बुकींनी पथारी पसरण्याचा प्रयत्न चालविला आहे.
मुख्य बुकींनी एजंट नेमलेत. या एजंटांमधील काहींनी पानशॉपच्या नावाखाली तर काहींनी हातगाड्यांवर हा व्यवसाय थाटलाय. पानशॉपमध्ये मोबाईलद्वारे तर हातगाड्यांवर चिठ्ठीद्वारे आकडे लावले जातायत. (प्रतिनिधी)

Web Title: Close 'Videos'; 'Open' in the middle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.