बंधाऱ्याला पडलेले भगदाड तीन तासांत बंद, लोकसहभागातून उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 10:59 AM2019-12-04T10:59:52+5:302019-12-04T11:02:47+5:30
अवकाळी पावसाने माण नदीला महापूर आला आणि कधीच न भरलेला बंधारा अवघ्या तासाभरातच भरला. शेतकरी आनंदले खरे; पण या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने या आनंदावर विरजन पडले. मात्र, यामुळे खचून न जाता नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होताच ग्रामस्थांनी लोकसहभागातून अवघ्या तीन तासांत बंधारा तुंबवला. त्यामुळे रिकामा झालेला बंधारा आता पाण्याने भरणार असल्याने गोंदवलेकरांचे चेहरे पुन्हा खुलले आहेत.
दहिवडी : अवकाळी पावसाने माण नदीला महापूर आला आणि कधीच न भरलेला बंधारा अवघ्या तासाभरातच भरला. शेतकरी आनंदले खरे; पण या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने या आनंदावर विरजन पडले. मात्र, यामुळे खचून न जाता नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होताच ग्रामस्थांनी लोकसहभागातून अवघ्या तीन तासांत बंधारा तुंबवला. त्यामुळे रिकामा झालेला बंधारा आता पाण्याने भरणार असल्याने गोंदवलेकरांचे चेहरे पुन्हा खुलले आहेत.
दुष्काळी माणला पाणी मिळावे म्हणून जिहे-कटापूर योजनेतून माण नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकीच गोंदवले बुद्रुक येथील इनाम शिवाराजवळ देखील एक बंधारा आहे. या बंधाऱ्याला पूर्वी लोखंडी फळ्या होत्या. त्याही वेळेत बसविल्या जाण्यात दिरंगाई होत होती.
तसेच फळ्या बसविल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाणी वाया जाई. त्यामुळे हा बंधारा पाणीसाठा होण्यासाठी फारसा उपयोगी पडत नव्हता. बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील काहीच हालचाल होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकसहभागातून डागडुजी केली.
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या लोखंडी फळ्यांच्या जागी काँक्रिटीकरण करून संपूर्ण बंधारा बंदिस्त करण्यात आला अन् बंधारा दुरुस्त झाला. पावसाने मात्र सलग तीन वर्षे ओढ दिल्याने दुरुस्त झालेला हा बंधारा रिकामाच राहिल्याने शेतकरी चिंतेत होते. यंदाच्या पावसाने मात्र बंधारा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून वाहिला.
भविष्यातील शेतीची चिंता आता मिटली असल्याने सर्वांनीच सुस्कारा सोडला खरा; पण नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे बंधाऱ्याच्या कडेची माती वाहून मोठे भगदाड पडले. परिणामी अवघ्या तीन ते चार दिवसांतच हा बंधारा पुन्हा रिकामा झाला. त्यामुळे शेतीला पाणी मिळविण्याचा चंग बांधलेले शेतकरी हवालदिल झाले; पण, जिद्द कायम होतीच.
क ाहीही करून बंधाऱ्यात पाणीसाठा करण्यासाठी पुन्हा सर्वजण एकवटले. नदीला पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बंधाऱ्याचे हे भगदाड बुजविण्यासाठी अडचण निर्माण झाल्याने हा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत होते. गेल्या चार दिवसांपूर्वी प्रवाह कमी होताच लाभक्षेत्रातील पंचवीस तीस शेतकऱ्यांनी पंचवीस हजारांहून अधिक रक्कम जमा
झाली.
नियोजनासाठी प्रयत्न गरजेचे
माण नदीला पाण्याची धार सुरू असल्याने आठवडाभरात या बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा राहू शकतो. त्यामुळे या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रातील पाण्यावाचून पडून असणाऱ्या सुमारे पन्नास एकर शेतजमिनी ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु भविष्यातील पाण्याच्या नियोजनासाठी या बंधाऱ्याला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
इनाम शिवारातील शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी या एकमेव बंधाऱ्याचा उपयोग होतो. त्यामुळे आम्ही शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून तातडीने या बंधाऱ्यांची डागडुजी केली आहे.
-बाळासाहेब पाटील,
शेतकरी, गोंदवले बुद्रुक