खुनाचा प्रयत्न करणाऱ्या कापड दुकानदाराला तीन वर्षे शिक्षा
By दत्ता यादव | Published: April 25, 2024 09:33 PM2024-04-25T21:33:23+5:302024-04-25T21:35:49+5:30
कारंडवाडीतील घटना; बायकोशी का बोलतोस विचारल्याने चाकूने भोसकले.
दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : ‘माझ्या बायकोशी दारू पिऊन का बोलतोस,' असे म्हणाल्याच्या कारणावरून विजय हरी भोसले (रा. देगाव, ता. सातारा) यांच्या पोटात चाकू भोसकून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ३ रे एन. एच. जाधव यांनी एका कापड दुकानदाराला तीन वर्षे साधी कैद तसेच २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
लक्ष्मण धनंजय पाटील (वय ३८, रा. कारंडवाडी, ता. सातारा), असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कापड दुकानदाराचे नाव आहे. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, कारंडवाडी, ता. सातारा येथे ११ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विजय भोसले यांनी आरोपी लक्ष्मण पाटील याला जाब विचारला. ‘तू दारू पिऊन माझ्या बायकोशी का बोलतोस’ असे म्हणताच लक्ष्मण पाटील याने त्याच्या जवळील चाकूने विजय भोसले यांच्या पोटात चाकूने भोसकले. यात भोसले जखमी झाले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात लक्ष्मण पाटील याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक ए. एस. चाैधरी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी लक्ष्मण पाटील याला तीन महिने साधी कैद व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम जखमी विजय भोसले यांना देण्यात यावी, असा आदेश देण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता फेरोज शेख यांनी खटल्याचे काम पाहिले. पोलिस प्राॅसिक्यूशन स्काॅडचे पोलिस उपनिरीक्षक सुनील सावंत, सहायक पोलिस फाैजदार शशिकांत गोळे, हवालदार गजनान फरांदे, महिला पोलिस हवालदार रहिनाबी शेख, पोलिस काॅन्स्टेबल राजेंद्र कुंभार, अमित भरते यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.