औंधला ढगफुटीसदृश पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:55 PM2017-10-08T23:55:53+5:302017-10-08T23:55:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा/ औंध: जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी दुपारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले. औंध येथे दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने ऐतिहासिक तळे फुल्ल भरून सगळ्या रस्त्यांवर पाणीच-पाणी झाले. एवढेच नव्हे तर श्री यमाई देवी मंदिरात तसेच मोकळाई देवीच्या मंदिरात पाणी शिरले.
दरम्यान, यापेक्षाही जोरदार पाऊस मूळपीठ डोंगरावर कोसळत होता. दोन तास झालेल्या जोरदार पावसामुळे औंध येथील घरांमध्ये, रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहत होते. हे पाणी ग्रामनिवासिनी श्री यमाई मंदिरात घुसले. मोकळाई देवीच्या मंदिरातही पाणी घुसले तसेच काही घरांच्या भिंती पडूनही नुकसान झाले आहे. तसेच औंध परिसरातील अनेक गावांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली.
औंधवर यंदा मागील दहा वर्षांतील हा विक्रमी पाऊस पडला असून, पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या पावसाचे सर्व फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दुष्काळी भागात इतका पाऊस पडतो हे कोणाला पटत नव्हते. त्यामुळे औंध भागातील आपापल्या पै-पाहुणे नातेवाइकांना फोनवरून या पावसाची खातरजमा करीत होते.
या ढगफुटीसदृश पावसाने औंधमधील अनेक घरांत पाणी घुसले असून, अनेक ठिकाणी घरांच्या भिंतीही कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पावसामुळे कुंभारवाड्यानजीकचा, गोटेवाडी, पवारमळा तसेच औंध ते खरशिंगे मार्गावरील रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अनेक ठिकाणी शेतांमधील पिकांचे आणि बटाटा पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
पूल वाहून गेल्याची भीती
औंध ते गोटेवाडीकडे जाणारा पूलही पावसाने वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, सायंकाळी उशिरापर्यंत या पुलावरून पाणी वाहत होते. हा पूल एकाबाजूने खचल्याचे दिसत आहे.
युवकांकडून स्वयंस्फूर्तीने मदत
तळे परिसरातील तसेच अन्य काही ठिकाणी पावसाने नुकसान झालेल्या कुटुंबीयांना युवक स्वयंस्फूर्तीने मदत करीत होते. त्यांना आधार देत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत होते. औंधच्या इतिहासात प्रथमच असा पाऊस यापूर्वी दहा वर्षांपूर्वी झाला होता.
थोड्या प्रमाणात पाणी गावात आले होते; पण इतका मोठा पाऊस
कधीही पाहिला व झाला नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तसेच औंधच्या सर्व बाजूस अगदी डोंगर-कपारीतही पाणी साठल्याचे दृश्य पाहावयास
मिळत आहे.
भिंत कोसळली; अनेक घरांत पाणी
येथील प्रमोद मोरे यांच्या घराची भिंत पडली आहे. तसेच वनीता काटकर, सुभाष धोंगडे, नथू कोळी, लक्ष्मी इंगळे, सावित्री यादव या तळे परिसरात राहणाºया रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे, घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी औंध येथील युवक, नागरिकांनी मदत करून घरातील साहित्य बाहेर काढले.