दोन दिवसांत थंडी पळाली; साताऱ्याचा पारा पुन्हा १८ अंशावर
By नितीन काळेल | Published: December 18, 2023 04:09 PM2023-12-18T16:09:34+5:302023-12-18T16:09:45+5:30
किमान तापमानात पाच अंशाने वाढ; ढगाळ हवामान निर्माण
सातारा : जिल्ह्यात यंदा थंडीचे प्रमाण कमी असून दोन दिवसांतच सातारा शहराचा पारा पाच अंशाने वाढला. त्यामुळे किमान तापमान १८.५ अंशापर्यंत गेले आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार होत असल्याने थंडी पुन्हा गायब झाली आहे.
जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्यानंतर थंडीच्याबाबतीतही असेच चित्र आहे. कारण, नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होते. यंदा मात्र, डिसेंबर सुरू झालातरी थंडीचा कडाका पडला नाही. गेल्या पाच दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाला. त्यामुळे पारा घसरु लागला. त्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात चांगलीच थंडी जाणवली. सातारा शहराचा पारा तर १३ अंशापर्यंत खाली आला होता. आताच्या हिवाळ्यातील हे नीच्चांकी तापमान ठरले. त्यातच एकदम पारा घसरल्याने थंडी चांगलीच जाणवली.
पण, कडाक्याच्या थंडीपासून सातारकर दूर राहिले. कारण, दोन दिवसांतच पारा पुन्हा वाढला. रविवारी आणि सोमवारी सातारा शहराचे किमान तापमान १८ अंशावर गेले. परिणामी थंडी गायब झाली आहे. त्यातच ढगाळ वातावरणही तयार होत आहे. यामुळेही थंडीवर परिणाम झाला आहे. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही थंडी कमी आहे.
सातारा शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. पण, जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरचा पारा अजून १३ अंशादरम्यान आहे. यामुळे महाबळेश्वर आणि परिसरात थंडी जाणवत आहे. शुक्रवारी येथील किमान तापमान १२.५ अंश नोंद झाले. तर गेल्या दोन दिवसांत वाढून ते १३.५ अंशापर्यंत पोहोचले आहे.
पिकांना फायदा..
जिल्ह्यात रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. यामध्ये ज्वारीसह गहू, हरभरा आदी पिके घेतली जातात. सध्या पिके उगवून आली आहेत. या थंडीचा फायदा गहू आणि हरभऱ्याला होणार आहे.
सातारा शहरातील नोंद किमान तापमान..
दि. ४ डिसेंबर १५.०९, ५ डिसेंबर १५.०२, दि. ६ डिसेंबर १५.०२, ७ डिसेंबर १३.०६, ८ डिसेंबर १४.०३, ९ डिसेंबर १४.०७, १० डिसेंबर १५.०५, दि. ११ डिसेंबर १५, १२ डिसेंबर १५.०५, १३ डिसेंबर १४.०४, १४ डिसेंबर १३.०५, दि. १५ डिसेंबर १२.०५, दि. १६ डिसेंबर १३.०५, १७ डिसेंबर १८.१ आणि दि. १८.५