नगर पालिकेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे मलकापूर नगरपंचायत सभा : १ कोटी ६८ लाखांच्या विकासकामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:26 PM2018-02-17T23:26:03+5:302018-02-17T23:26:25+5:30
मलकापूर : नगपंचायतीच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील ४० विषयांसह ऐनवेळचे ३ अशा ४३ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
मलकापूर : नगपंचायतीच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील ४० विषयांसह ऐनवेळचे ३ अशा ४३ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ऐनवेळी घेतलेला मलकापूर नगरपरिषद करणे हा विषय शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून नगरपरिषद जाहीर करण्यासाठी फेब्रुवारीच्या अधिवेशनात भेटून साकडे घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला. त्याबरोबरच सांडपाणी योजनेचे काम मार्चअखेर पूर्ण करणे यासह १ कोटी ६८ लाखांच्या विकासकामांना प्रत्यक्ष वर्कआॅर्डर काढण्यास मंजुरी दिली.सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनीता पोळ होत्या. सभेचे विषय वाचन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
सभेत विषयपत्रिकेवरील प्रमुख ४, पाणीपुरवठा विभाग १२, करविभाग ३, लेखा विभाग १, संगणक विभाग ५, बांधकाम विभागाच्या १०, आरोग्य व सांडपाणी विभागाच्या ४, तसेच ऐनवेळी ३ अशा एकूण ४३ विषयांवर सविस्तर चर्चा करून एकमताने मंजुरी देण्यात आली.
मलकापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमास थोडाच अवधी राहिला आहे. जर नगरपरिषद झाली तर नगरसेवक संख्या दोनने वाढणार आहे. नाहीतर नगरपंचायतीसाठी सतराच सदस्य संख्या राहील. तरी त्याअगोदर आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटून पाठपुरावा केला तर बरे होईल, अशी सूचना उपनगराध्यक्ष शिंदे यांनी सभेदरम्यान मांडली. त्यावर नगरसेवक हणमंतराव जाधवसह सर्व नगरसेवकांनी अनुमोदन देत मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्यामुळे येणाºया विधानसभा अधिवेशनात मलकापूर नगरपंचायती नगरपरिषद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सांडपाणी योजनेचे काम महिन्यात करणार
सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम महिनाभरात पूर्ण करावा, अन्यथा निधी परत जाईल, अशी शासनाने अट घातली आहे. परिणामी शिल्लक राहिलेल्या कामाच्या निधीची जबाबदारी नगरपंचायतीवर राहील. निधीतील एक रुपयाही परत जाणार नाही. यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणे यामध्येही टीमवर्कने काम करून नगरसेवकांनी सहकार्य करावे. मी स्वत: सर्व नगरसेवकांच्या वतीने हमीपत्र शासनाला दिले आहे. तेव्हा तुम्ही कंबर कसून कामाला लागा, असे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी नगरसेवकांना सभेदरम्यान सांगितले. यावर योजना मार्चअखेर पूर्ण करण्याचा सभागृहाने एकमुखी ठराव केला.
...तर घरपट्टीत २० टक्के सूट देण्याचा ठराव
नगरपंचायतीच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अॅडव्हॉन्स टॅक्सचा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच करण्याचा ठराव करण्यात आला. आगामी वर्षाचा कर ३१ मार्चपूर्वी भरणाºया मिळकतदारास करात दहा टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ज्यांच्या घरावर सोलर वॉटर हिटर बसवलेले आहे, अशा मिळकतदारांना अपारंपरिक ऊर्जा वापराबद्दल यापुढे ५ वर्षे १० टक्के सूट देण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. त्यामुळे ही दोन्ही कसोट्या पूर्ण करणाºया मिळकतदारास घरपट्टीत (करात) २० टक्के सूट देण्याचा ऐतिहासिक ठराव सभेत करण्यात आला आहे.
सर्वसाधारण सभेतील महत्त्वपूर्ण ठराव
महिला दिनानिमित्त स्पर्धात्मक कार्यक्रमांसह आरोग्य तपासणी करणे.
नगरपंचायतीच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून ५ ते ७ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम घेणे.
स्वच्छ सर्वेक्षणात पंधरावे स्थान मिळविल्याद्दल कौतुकाचा ठराव.
वुमन्स फॅसिलिटी सेंटरमध्ये योगा वर्ग सुरू करणे.
विविध कामांची मराठी भाषेतील डॉक्युमेंटरी फिल्म तयार करण्यास मंजुरी
ओल्या कचºयाचे निर्मूलन करणाºया मिळकतदारास घरपट्टीत कायमस्वरुपी ५ टक्के सवलत देणे.
नगरपंचायत कार्यालय, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, ५ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया योजना या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे.