"उद्योग पळवले म्हणता, मग पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते"; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
By नितीन काळेल | Published: March 9, 2024 06:11 PM2024-03-09T18:11:47+5:302024-03-09T18:12:08+5:30
मुनावळेत कोयना जलपर्यटनाचा प्रारंभ; स्थानिकांना रोजगार उपलब्ध
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: सह्याद्रीच्या कुशीत निसर्गस्थळे लपली आहेत. त्याचा विकास करण्यासाठी इच्छाशक्ती हवी. कोयना जलपर्यटन प्रकल्पातून तर स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भूमिपूत्रांना बाहेर नोकरीसाठी जावे लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य आहे. उद्योग पळवले म्हणतात, मग राज्यात पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
मुनावळे, ता. जावळी येथे कोयना जलाशयाच्या तीरावर महाराष्ट्र शासन पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जलपर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसीच्या व्यवस्थापक शर्मा, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, जयंत शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्रकल्पाचे सल्लागार सारंग कुलकर्णी, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘देशातील धरणातील पहिलाच जलक्रीडा प्रकल्प मुनावळे येथे होत आहे. अशी कामे होण्यासाठी इच्छाशक्ती लागते. या मातीतील मी सुपूत्र असल्याने मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. कोयना धरणापासून मागे ४० किलोमीटरपर्यंत बॅकवाॅटर आहे. पण, मुख्यमंत्री झाल्यापासून धरणाबाबतचा हा कायदाच काढून टाकला. त्यामुळेच हे पर्यटन केंद्र होत आहे. आता मासेमारीही होत आहे. येथील जलक्रीडा केंद्र तर २५ एकरमध्ये होणार आहे. पर्यावरणपूरक आणि पाण्याचे प्रदूषण न होता हा प्रकल्प होणार असल्याने यातून स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे. यामुळे येथून पुढे कोणी नोकरीसाठी बाहेर जाणार नाही. जे बाहेर गेले आहेत तेच आता माघारी आले पाहिजेत, असा उद्देश या प्रकल्पामागे आहे.
कोयना भागातच आपटी-तापोळा पूल तसेच रघुवीर घाटातून कोकणला जोडणारा घाटरस्ता होणार आहे. यामुळे कोकणचे ६-७ तासांचे अंतर दीड तासावर येणार आहे. त्यातच कोयना भागात विकासाच्या खूप संधी आहेत. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचं सरकार सामान्यांचं, शेतकरी, कष्टकरी, महिला तसेच तरुणांचं आहे. या सरकारने विकासाचेच काम केले आहे. त्यामुळे पायाभूत विकासाबरोबरच परदेशी गुंतवणुकीतही राज्य प्रथम क्रमांकावर आहे. दावोसमध्ये ३ लाख ७३ हजार कोटींचे करार झाले. राज्यातील उद्योग दुसरीकडे गेले असते तर पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते. आता कोयना परिसरातही उद्याेगपती येतील. त्यांना सोयीसुविधा पुरावायला हव्यात.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कोयना भाग हा डोंगरी आहे. सतत शासनग्रस्त झालेला भाग आहे. या प्रकल्पामुळे या भागातून मुंबईकडे जाणारा ओढा कमी होईल. हे शास्वत उत्पन्न राहणार असल्याने या प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळावा. कारण आमचा त्यावर कायम हक्क आहे. यासाठी येथील लोकांना प्रशिक्षण द्यावे. तसेच जलाशयात मासेमारीची परवानगी द्यावी, असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी काढले पहिले तिकीट; बोटीतून दरे-मुनावळे प्रवास...
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पर्यटन विकास विभागाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासह अन्य मान्यवरांनी काउंटरवर तिकीट खरेदी केले. तर या कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्री आणि अधिकाऱ्यांनीही दरे ते मुनावळे हा येण्याजाण्याचा प्रवास बोटीने केला. यावेळी शिवसागर जलाशयात विविध बोटीच दिसून येत होत्या. या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सरपंच भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.