मुख्यमंत्री रमले स्टॉबेरीच्या शेतात, गावच्या यात्रेसाठी दाखल: आपल्या लोकांमध्ये आल्याचे समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 08:09 PM2023-01-06T20:09:12+5:302023-01-06T20:09:29+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून आपल्या दरे या मूळ गावी शेतीची पाहणी केली.
बामणोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून आपल्या दरे या मूळ गावी त्यांनी शेतीची पाहणी केली. राजकारणातून ब्रेक घेत शिवारात राबले. त्यांनी चार महिन्यांपूर्वी लावलेल्या स्ट्रॉबेरीला आता लाल चुटूक फळे आली आहेत. ही स्टॉबेरी त्यांनी हाताने तोडून त्याची चव चाखली. रोजच होत असलेलं राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून ब्रेक घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी शेतात रमले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जी पिक घेतली जात नाही त्या पिकांची लागवड चक्क आपल्या शेतात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळगावी दाखल झाले असून पुढील २ दिवस ते गावी मुक्कामी असणार आहेत. उत्तेश्वर या ग्रामदैवताची यात्रा असल्याने ते यात्रेला उपस्थित राहणार आहेत.. या भागातील १० गावांची यात्रा असल्याने मोठे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री ९ पासून यात्रेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून रात्री उशिरापर्यंत ही यात्रा चालणार आहे. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी गावाकडील घराच्या परिसरात फेरफटका मारून बांधकामाचा देखील आढावा घेतला.
शेतात स्वत: काम केलं पाहिजे
“आपण शेतात स्वत: काम केलं पाहिजे. तेव्हा आपण दुसऱ्याला सांगू शकतो. नवं तंत्रज्ञान वापरायला हवं. आपण इथे ते वापरलं आहे. ठिबक सिंचनने एकाच वेळी सगळ्याच झाडांना पाणी मिळतं”, असं मुख्यमंत्री म्हणाले. “मला गावाची ओढ आधीपासून आहे. मी वर्षातून एक-दोन वेळा तरी गावाला भेट देतो. त्यामुळे मी वेळ काढून इथे आलो. इथे छान वाटतं. निसर्गरम्य वातावरण आहे. वाहनं नाहीत, मोबाईलची रेंज पकडत नाही. शांतता आहे, प्रदूषण नाही, आवाज नाही. शांततेचा अनुभव घ्यायला मिळतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या शेतात कोणती पिकं?
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शेतात कोणतंच रासायनिक खत वापरलेलं नाही. त्यांच्या शेतामध्ये लवंग, वेलची,दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद या सह लाल चंदन, बाहेरच्या राज्यात पिकणारे गवती चहा अशा विविध प्रकारच्या झाडांमधून त्यांनी आपली संपूर्ण शेती फुलवली आहे. एकनाथ शिंदेंच्या शेतामध्ये असलेलं गवती चहाचं पिक आगळं वेगळं आहे. या गवती चहाची उंची तब्बल १० फुट आहे.