खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा कोयनानगर दौरा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:40 AM2021-07-27T04:40:49+5:302021-07-27T04:40:49+5:30
कऱ्हाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर येथे सोमवार, २६ जुलै रोजी दौरा नियोजित होता. मात्र खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री ...
कऱ्हाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर येथे सोमवार, २६ जुलै रोजी दौरा नियोजित होता. मात्र खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकाॅप्टर कोयनानगरमध्ये उतरुच शकले नाही. खराब हवामानामुळे ते परत पुण्याकडे रवाना झाले. जोराचा पाऊस, वारा व ढगाळ वातावरणाने दौरा रद्द झाल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मंत्री देसाई म्हणाले, ‘मुख्यमंत्री ठाकरे कोयनानगरच्या दौऱ्यावर येण्यासाठी निघाले होते. मात्र ढगाळ वातावरण व मुसळधार पावसाने त्यांचे हेलिकॉप्टर परत पुण्याकडे गेले. पाटण तालुक्यातील स्थिती अतिवृष्टी व पुरामुळे गंभीर बनली आहे. आंबेघर, मिरगाव, ढोकावळे येथे दरडी कोसळून जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी कोयनानगर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पाटण परिसरातील लोकांना भरीव मदत मिळेल तसेच पुनर्वसनाबाबतचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. दोन दिवसांपासून या दौऱ्याची चर्चा होती. त्यासाठी सर्व लवाजमा कोयनानगरमध्ये दाखल झाला होता. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उतरु शकले नाही. हवामानात बदल झाल्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा येईल अशी आशाही या परिसरातील लोकांना होती. मात्र, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याची तयारी नसल्याने हे हेलिकॉप्टर पुन्हा पुण्याकडे माघारी फिरवावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीच आपदग्रस्तांचे तात्पुरते पूनर्वसन, तातडीची मदत आणि कायमचे पुनर्वसन याबाबत माहिती दिली.
चौकट
मग मदत कशी पुरविणार?
अतिवृष्टीमुळे नुकसान व जीवितहानी झालेल्या पाटण तालुक्यातील परिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे येणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकाॅप्टर कोयनानगरला उतरू शकले नाही. जेथे खराब हवामानामुळे हेलिकाॅप्टर पोहोचू शकत नाही तेथे बाधितांना मदत कशी पोहोचणार, असा प्रश्न विचारला जात आहे.