Satara: टँकरमधील सीएनजी गॅस गळती, चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 06:38 PM2024-05-24T18:38:54+5:302024-05-24T18:39:47+5:30
गॅसमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास..
मलकापूर (जि. सातारा) : सीएनजी गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या वाहनातून अचानक गॅस गळती झाल्याने येथील पुणे-बंगळुरु महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. गॅस गळती बंद झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजी सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक (एमएच- ०४, ईएल- ४००९) हा येलूर (ता. वाळवा) येथे सीएनजी गॅस भरून भुईंज (जि. सातारा) येथे जात होता. पुणे-बंगळुरु महामार्गावर मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी पेट्रोलपंपासमोर आला असता, सिलिंडरमधून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी गॅस मोठ्या प्रमाणावर बाहेर आला व मोठा आवाज झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
महामार्गाशेजारी असलेल्या शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना शेतात हलवण्यात आले. ट्रकचालक संदीप भगवान बनसोडे (रा. कुंडलवाडी, ता. वाळवा) यांनी सिलिंडरचा मुख्य नाॅब बंद करून गाडी महामार्गाकडेला उपमार्गावर लावली. महामार्ग पोलिस व कऱ्हाड शहर पोलिसांसह कऱ्हाड पालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळती बंद झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.
गॅसमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास..
गॅस गळतीचा आवाज अर्धा किलोमीटर परिसरात येत होता. या गॅसच्या वासामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. घरातील नागरिकांनी काही अंतरावर जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला. गॅस टँकर महामार्गाच्या मध्येच असल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे एक तासानंतर परिस्थिती आटोक्यात आली.