प्रत्येक गावांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे- उदयनराजे

By मुकेश चव्हाण | Published: December 16, 2020 05:06 PM2020-12-16T17:06:35+5:302020-12-16T17:06:59+5:30

येत्या १५ जानेवारीला सातारा जिल्ह्यातील तब्बल ९०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे.

Co-operate with the administration by holding Gram Panchayat elections without any opposition, said BJP MP Udayan Raje Bhosale | प्रत्येक गावांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे- उदयनराजे

प्रत्येक गावांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे- उदयनराजे

googlenewsNext

मुंबई/ सातारा: राज्यभरात १५ जानेवारी २०२१ ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, मनसे या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे, अशी साद भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घातली आहे. 

येत्या १५ जानेवारीला सातारा जिल्ह्यातील तब्बल ९०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेले ९-१० महिने शेतकर्‍यांसह संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेकांना प्राणासही मुकावे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणुका आल्यामुळे प्रथेप्रमाणे गावागावांत भांडणतंटे, ईर्ष्या, चढाओढ पहायला मिळणार आहे. त्यामुळे कोविड विरोधात लढणारे पोलीस, लोक प्रशासन, वैद्यकीय आरोग्य कर्मचार्‍यांवर फार मोठ्या प्रमाणात ताण वाढणार आहे. हे टाळायचे असेल तर प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे. अशा गावांना राज्यातून आणि विशेषकरुन केंद्रातून लोकसंख्येनुसार विशेष निधी उभा करुन विकासात्मक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहे, असं आश्वासन उदयनराजे यांनी फेसबुकद्वारे दिले आहे. 

ग्रामपंचायती या ग्रामविकासाचा पाया समजल्या जातात, तर ग्रामपंचायत निवडणुकी या लोकशाहीचा पाया समजल्या जातात. आजदेखील राज्यातील विविध गावांमध्ये निवडणुका सोडल्या तर अन्य बाबतीत गट-तट बाजूला ठेवून यात्रा-जत्रा आणि गावाच्या सर्वांगिण विकासाचे उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागातील कष्टकरी व शेतकरी वर्गामुळे अजूनही माणुसकी टिकून आहे. तथापि कोणत्याही निवडणुका आल्या की, विशेषत: ग्रामीण भागात ईर्ष्या, चढाओढ, मी मोठा की तू मोठा असे म्हणत निवडणुकांदरम्यान घमासान घडून धुमश्‍चक्री उडते. प्रसंगी संपूर्ण गावास वेठीस धरले जाते. निवडणुकांमध्ये दुभंगलेली मने पुन्हा कधीही जुळून येत नाहीत. त्यामुळे भावकी गावकीत पिढ्यान्पिढ्या संघर्ष सुरु राहतो. त्यामुळे गावच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर खीळ बसतेच. परंतू त्यापेक्षाही गावातील निकोप वातावरण गढूळ होते, याची प्रचिती गेली काही दशके संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय.

निवडणुका या लोकशाहीचा पाया समजल्या जात असल्या तरी त्या निकोप तसेच स्पर्धात्मक होणे गरजेचे आहे. अलिकडच्या काळातील निवडणुका पाहिल्या तर जवळपास सर्वच गावांत दोन उभे गट पडलेले दिसून येतात. यावर्षीच्या सुरुवातीलाच कोरोना या विषाणुचा संसर्ग संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर पसरला. कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी देशासह संपूर्ण राज्यभरात लॉकडाऊन जाहीर करावे लागले. लॉकडाऊन ते अनलॉक या प्रक्रियेमुळे शेतकरी, कष्टकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे. इच्छा असूनही काही प्रमाणात का होईना कोरोनाच्या सुरु असलेल्या काळात जनतेवर मोठ्या प्रमाणावर बंधने आली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सुमारे ९०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुका गावपातळीवर असल्याने त्याच्या धुरळ्याने प्रत्येक गावातील घरटी उडणार आहेत. 

आधीच कोरोनाचा संसर्ग, त्यात निवडणुकांचा विसर्ग. त्यामुळे गावांत कोरोना संसर्गाची भीतीही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्या अनुषंगाने हेवे-दावे विरहित, ग्रामस्थांच्या वैचारिक सहकार्यातून बिनविरोध निवडणुका झाल्यास त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावच्या एकीद्वारे घेण्यात आलेल्या निवडणुका म्हणजे ‘गाव करील, ते राव काय करील’ ही म्हण सार्थ ठरवणार्‍या असणार आहेत. संपूर्ण देशाला नवी दिशा देणार्‍या या निवडणुका ठरणार आहेत. त्यामुळे हेवे-दावे विरहित, बिनविरोध निवडणुका विविध गावांतील ग्रामस्थांनी केल्या तर त्या गावांना राज्यातून, विशेषत: केंद्रातून विकासात्मक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असू.



प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे. अशा गावांना राज्यातून आणि विशेषकरुन...

Posted by Chhatrapati Udayanraje Bhonsle on Tuesday, 15 December 2020

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचं संकट असल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र नुकत्याच सुरळीत झालेल्या पदवीधर निवडणुकांनंतर ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Web Title: Co-operate with the administration by holding Gram Panchayat elections without any opposition, said BJP MP Udayan Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.