वाळू तस्करांनी कोयना नदीपात्र पोखरले, बंधाऱ्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:58 PM2017-10-26T16:58:02+5:302017-10-26T17:04:28+5:30
तांबवे येथील कोयना नदीवरील पुलापासून सुमारे पन्नास मीटरवर रात्रीचा वाळू उपसा केला जात आहे. गत दोन दिवसांपासून ही वाळू चोरी जोरात सूरू असून, त्यामुळे जुना पूल व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाला धोका निर्माण होत आहे.
तांबवे , दि. २६ : येथील कोयना नदीवरील पुलापासून सुमारे पन्नास मीटरवर रात्रीचा वाळू उपसा केला जात आहे. गत दोन दिवसांपासून ही वाळू चोरी जोरात सूरू असून, त्यामुळे जुना पूल व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला धोका निर्माण होत आहे.
तांबवे येथील कोयना नदीवर नवीन पुलाचे काम सूरू आहे. पुलाचे काम करणारा ठेकेदार येथीलच नदीपात्रातील वाळू कामासाठी वापरत आहे. ठेकेदाराच्या या प्रतापाचा फायदा घेऊन इतर वाळू ठेकेदारही याठिकाणी उपसा करण्यासाठी सरसावले आहेत.
अद्यापही कोयना नदीतून वाळू उपसा करण्यासाठी कुणालाही परवानगी देण्यात आली नाही. तरीही गेल्या चार दिवसांपासून पूल व बंधारा यादरम्यान रात्रीचा वाळू उपसा केला जात आहे. पूल व बंधाऱ्याजवळ कोणालाही उपसा करण्याची परवानगी नसतानाही बेधडकपणे हा प्रकार सुरू आहे. या वाळू उपशाला कोणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.
या वाळू उपसामुळे नवीन व जुन्या पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. पुलापासून ५० मीटर अंतरावरच खोदकाम सुरू आहे. तसेच तेथे कोल्हापूर पद्धतीचा बंधाराही आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संबंधित वाळू उपसा करणाऱ्याना ग्रामस्थांनी त्याबाबत विचारणा केली असता, चलन भरले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते.
मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्याना विचारणा केली असता कोयना पात्रात वाळू उपसा करता येत नाही. आणि तसा परवानाही कोणाला दिला गेला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या उपसामागील गौडबंगाल काय? हे ग्रामस्थांना समजून येत नाही. कोयना नदीपात्रातून वाळूचा उपसा करणाऱ्यावर कठोर कारवाई करून हा उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.