पार्लेसह बनवडीत सत्तांतराचा नारळ फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:39 AM2021-01-19T04:39:05+5:302021-01-19T04:39:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपर्डे हवेली : विभागातील बनवडी व पार्लेत सत्तांतराचा नारळ फुटला तर वडोली निळेश्वरमध्ये स्थानिक आघाडीतून निळेश्वर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपर्डे हवेली : विभागातील बनवडी व पार्लेत सत्तांतराचा नारळ फुटला तर वडोली निळेश्वरमध्ये स्थानिक आघाडीतून निळेश्वर परिवर्तन पॅनेलने सत्ता मिळवली.
बनवडी आणि पार्ले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. सत्ता कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी गट जोमाने कामाला लागला होता. तर सत्तांतर करण्यासाठी विरोधी गटाचे मोठे प्रयत्न सुरू होते. अखेर या दोन्ही ठिकाणी सत्तांतराचा नारळ फुटला. बनवडी ग्रामपंचायतीत वीस वर्षांनंतर सत्तांतर झाले. सर्वपक्षीय जनशक्ती पॅनेलला दहा सदस्य निवडून आणण्यात यश आले तर राष्ट्रवादीच्या जनसेवा पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. जनसेवा पॅनेलचे नेतृत्व शंकरराव खापे यांनी केले तर सर्वपक्षीय जनशक्ती पॅनेलचे नेतृत्व विकास करांडे, भाऊसाहेब घाडगे व जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी केले.
पार्ले येथे दहा वर्षांनंतर सत्तांतर होऊन याठिकाणी काँग्रेसची सत्ता आली आहे. काँग्रेसला सहा तर राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व कऱ्हाड तालुका उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश नलवडे यांनी केले तर राष्ट्रवादी गटाचे नेतृत्व प्रकाश नलवडे, राहुल पाटील व तानाजी नलवडे यांनी केले.
वडोली निळेश्वर येथे निळेश्वर परिवर्तन पॅनेलने सत्ता मिळवली. निळेश्वर परिवर्तन पॅनेलला ५ सदस्य निवडून आणण्यात यश आले तर लोकशाही विकास आघाडीला ४ जागांवर समाधान मानावे लागले. निळेश्वर पॅनेलचे नेतृत्व सोमनाथ पवार, अमित पवार यांनी केले तर लोकशाही विकास आघाडीचे नेतृत्व शंकरराव पवार, बाबासाहेब पवार, दयानंद पवार यांनी केले.