नारळाच्या मोहातून ल्हासुर्णे येथे युवकाचा बळी, झाडाची फांदी तुटून पडला विहिरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 05:50 PM2022-02-22T17:50:18+5:302022-02-22T18:06:58+5:30
मृतदेह बाहेर काढण्यास तब्बल बारा तास लागले. कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे.
कोरेगाव : ल्हासुर्णे येथील युवक प्रतिक लक्ष्मण भांडवले या १९ वर्षाच्या युवकाचा नारळाच्या मोहातून बळी गेला. रात्रीच्या अंधारात झाडावरील नारळ तोडत असताना, अचानक फांदी तुटली आणि प्रतिक झाडालगत असलेल्या विहिरीच्या कठड्यावर पडला. त्यानंतर पाण्यात पडून त्याचा बुडून मृत्यु झाला.
ही घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यास तब्बल बारा तास लागले. कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रतिक हा ल्हासुर्णे येथील रहिवासी असून, रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयात शिक्षण घेत होता. सोमवारी सायंकाळी तो गावातील पारावर मित्रांबरोबर गप्पा मारत बसला होता, त्यानंतर मित्र विशाल सुतार याच्यासोबत गावातीलच चिरका नावाच्या शिवारातील प्रमोद सर्जेराव भिलारे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावरुन नारळ तोडण्यास तो गेला होता.
नारळ काढण्यासाठी प्रतिक झाडावर चढला, त्याचवेळी त्याने पकडलेली फांदी तुटली आणि तो थेट विहिरीच्या कठड्यावर कोसळला. त्यानंतर तोल जाऊन पाण्याने काटोकाट भरलेल्या विहिरीत तो पडला आणि तेथेच गंटागळ्या खाऊ लागला. रात्रीचा अंधार आणि थंडीमुळे त्याला पोहता आले नाही, दरम्यान मित्र विशाल याने गावातील इतरांना माहिती देऊन मदत मागितली.
मात्र दरम्यानच्या काळात प्रतिक हा बुडाला. पोलीस पाटील शिवाजी सावंत यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस पाटील शिवाजी सावंत, सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच राजेंद्र मचिंदर, माजी सरपंच प्रशांत संकपाळ, विशाल सावंत, राजेंद्र जाधव, समाधान माने, अमोल कदम, संग्राम गायकवाड, तुषार सावंत, संदीप सुतार, सतीश चव्हाण, जयवंत माने, अनिल भांडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. कोरेगावातील नातेवाईक चंद्रकांत सुतार यांनी मढपंप आणल्यानंतर विहिरीतून पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रतिकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दीपक रामचंद्र भांडवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक सचिन साळुंखे तपास करत आहेत.