‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ आता थंडगार पाणी!
By admin | Published: March 16, 2017 11:34 PM2017-03-16T23:34:37+5:302017-03-16T23:34:37+5:30
कऱ्हाड बसस्थानकात सोय : तापत्या उन्हापासून संरक्षणासाठी लाकडी मंडपही; थंडगार पाण्यासोबत सावलीचाही आधार
संतोष गुरव ल्ल कऱ्हाड
सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने थंडगार पाण्याची व शीत पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र, प्रवाशांच्या सेवेचा विचार करता कऱ्हाड बसस्थानक प्रशासनाकडून प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्यासाठी थंडगार पाण्याची सोय केली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी बसस्थानकात थंडगार पिण्याचे पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आले आहे. वाहतुकीच्या सुविधेबरोबर उन्हाळ्यात थंडगार पिण्याचे पाणी मिळत असल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन वावरणाऱ्या एसटी महामंडळ प्रशासनाने नेहमीच प्रवाशांच्या हिताचा विचार केला आहे. म्हणून तर प्रशासनाकडून प्रवासी व विद्यार्थ्यांसाठी अनेक हितकारक योजना सुरू केलेल्या आहेत. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचे काम ‘एसटी प्रशासनाकडून केले जाते. शालेय विद्यार्थ्यांसाठी मासिक पासची सोय, पर्यटनवाढीच्या दृष्टीने कमी शुल्कातील पर्यटन पॅकेज, मुलींसाठी विविध शासकीय योजनांतून मोफत एसटी प्रवास, तसेच अपंगांसाठी मोफत प्रवासाची सोय अशा प्रकारच्या अनेक योजना एसटी महामंडळ प्रशासनाकडून राबविल्या जात आहेत. त्याचा उपभोगही मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे.
कऱ्हाड हे सातारा, सांगली, कोल्हापूर, पाटण मार्गाना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून दिवंगत यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षातील शंभर कोटी निधीतून अकरा कोटी रुपये स्थानकाच्या नूतनीकरणासाठी देण्यात आले आहे. या निधीतून स्थानकाच्या सुसज्ज इमारतीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देण्याच्या दृष्टीने येथील प्रशासनाकडून नेहमीच प्रयत्न केले जात आहे.
मध्यंतरी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत होती. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसपासचाही प्रश्न निर्माण झाला होता. सध्या विद्यार्थ्यांच्या समस्येकडे येथील प्रशासनाकडून लक्ष दिले जात आहे. वाढत्या उष्म्यामुळे पाण्याची गरज भासते. त्यावेळी बसस्थानकात पाण्याचीही सोय नसते. त्यामुळे प्रवाशांना बाहेर जावे लागते. ही प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गरज ओळखत या ठिकाणी एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. तसेच त्यामधील थंडगार पाण्याचे दररोज बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांकडून सेवन केले जात आहे. एसटी प्रशासनाच्या सामाजिक बांधिलकीबद्दल प्रवाशांधून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)