जिल्ह्यात थंडीची लाट; आंबा, स्ट्रॉबेरीचे नुकसान
By admin | Published: March 1, 2015 10:42 PM2015-03-01T22:42:12+5:302015-03-01T23:14:37+5:30
ऊस तोडणी ठप्प
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. महाबळेश्वर, पाटण, कऱ्हाड, फलटण, जावळी, वाई, खंडाळा, माण, खटाव परिसरात रात्रभर व रविवारी दिवसभर पाऊस पडत होता. आंब्याचा मोहर गळाला असून, द्राक्ष बागा, स्ट्रॉबेरी, गहू ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. वाई, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठे उत्पादन घेतले जाते. हे पीक आता हातातोंडाशी आले असतानाच शनिवारपासून पडत असलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या पिकांना माती लागली आहे. त्यामुळे फळाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे गहू, ज्वारी झोपली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मायणी, कलेढोण परिसरातील द्राक्ष गळत असल्याने नुकसान होत असून, फळांना बुरशी येऊ लागली आहे. दुष्काळी माणमधील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने वाढविलेल्या डाळिंबाच्या बागांनाही हा पाऊस नुकसान करणारा आहे. महाबळेश्वर शहरातील एका झाडाची फांदी कारवर पडली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
ऊस तोडणी ठप्प
कोल्हापूरमध्ये ऊस तोडणी व वाहतूक ठप्प झाल्याने साखर कारखाने, गुऱ्हाळघरे बंद पडली, तर वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्यमनगरसह विविध छोट्या-मोठ्या उद्योगांची चाके थंडावली. सांगली जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, आंबा, गहू, ज्वारी, मका, हरभरा या पिकांसह फळबागांना फटका बसला आहे़पुणे जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा, आदी पिकांचे नुकसान झाले. काढणीला आलेल्या गव्हाचे प्लॉट भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़ नाशिकमध्ये द्राक्ष, गहू, कांद्यासह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती आहे.