करमणूक करातून साडेतीन कोटी तिजोरीत जमा
By admin | Published: May 12, 2016 10:22 PM2016-05-12T22:22:55+5:302016-05-12T23:44:55+5:30
सेट टॉप बॉक्सचा परिणाम : केबलचे २६ हजार तर डिश टीव्हीचे ५२ हजार ग्राहक वाढले
सागर गुजर - सातारा
सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक परंपरा दिमाखाने मिरविणारा सातारा मनोरंजनाच्या बाबतीतही मागे नाही. जिल्ह्यातील तब्बल अडीच लाख घरांतील टीव्हींवर केबल व डिश टीव्हीने कब्जा मिळविलेला आहे. या माध्यमातून शासनाला तब्बल ३ कोटी ४८ लाखांचा महसूल जमा होतोय. शहरी भागासाठी केबलच्या ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसविण्याची सक्ती केली याचा हा परिणाम असून, येत्या डिसेंबर अखेर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील गावांतील टीव्हींना सेट टॉप बॉक्स बसणार आहे.
मनोरंजन कराची वसुली व आॅनलाईन चलने भरण्यात सातारा जिल्हा विभागात प्रथम आला आहे. जिल्हा पातळीवर या विभागात केवळ ३ कर्मचारी काम करतात. एवढ्याशा कमी मनुष्यबळाने करमणूक कराच्या वसुलीच्या बाबतीत कोटींची उड्डाणे घेतली आहेत. गेल्या आर्थिक वर्षामध्ये सातारा जिल्ह्यात ६५ हजार ४५० इतकी केबल कनेक्शन होती, त्यात आता वाढ होऊन चालू आर्थिक वर्षामध्ये ती ९१ हजार म्हणजे २६ हजाराने वाढली आहेत.
गतवर्षी डीटीएच ची कनेक्शन १ लाख १० हजार २४१ इतकी होती, ती वाढून आता १ लाख ६३ हजार १८९ इतकी झाली आहेत. यामध्येही तब्बल ५२ हजार कनेक्शनची वाढ झालेली आहे.
दूरदर्शनचे चॅनेल्स टीव्हीवर मोफत पाहायला मिळतात; पण त्याच ठिकाणी इतर खासगी चॅनेल्सवरील कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायचा झाल्यास त्यासाठी केबल घेऊन अथवा डीटीएच (डिश) यंत्रणा बसवून या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा लागतो.
या नव्या यंत्रणेसाठी ग्राहकांच्या खिशाला चाट बसते. केबलसाठी ग्राहक महिन्याला भाडे भरत असले तरी केबल कनेक्शनची संख्या कमी दाखवून काही मंडळी शासनाचा महसूल बुडवत होते; परंतु सेट टॉप बॉक्समुळे आता प्रतिग्राहक १५ रुपये इतका मनोरंजन कर शासनाला भरणे क्रमप्राप्त आहे. सेट टॉप बॉक्सची यंत्रणा संपूर्ण शहरांना सक्तीची केल्याने आता ग्राहक संख्येत वाढ होऊन शासनाच्या महसूलातही वाढ झालेली आहे.
कऱ्हाड, हजारमाची, सैदापूर, पाटण, मलकापूर, सातारा शहर, खेड, करंजे तर्फ सातारा, गोडोली, कोडोली, मेढा, रहिमतपूर शहर, कोरेगाव, वाई, सोनगिरवाडी, लोणंद, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण, कोळकी, म्हसवड ही शहरे व शहरालगतची गावे यांना सेट टॉप बॉक्स बसविणे जिल्हा करमणूक शाखेतर्फे सक्तीचे केले आहे. या परिसरात आणखी ४ हजार कनेक्शन वाढतील, असा अंदाज या विभागाला आहे. जिल्ह्यातील राजलक्ष्मी (लोणंद) व न्यू चित्रा (वाई) या दोन सिनेमागृह चालकांनी करमणूक करमाफी स्विकारलेली नाही, तर इतर सिनेमागृहांनी करमाफीचा लाभ घेतला आहे. राधिका सिनेमागृहाने करमाफीचा लाभ घेतला असला तरी सिनेमागृह कायमस्वरुपी बंद केले आहे.
डिशची वसुली जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी
डिशची मनोरंजन करवसुली मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होते. हा महसूल जिल्ह्याच्या तिजोरीत जमा होत नाही. तसेच डिश टीव्ही निर्मिती अथवा विक्री करणाऱ्या कंपन्यांवरही सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही, हे नियंत्रण स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे आले तर डिश टीव्हीच्या मनोरंजन कर वसुलीत आणखी वाढ होऊ शकते.