तुळसणच्या युवकाकडे प्राचीन नाण्यांचा संग्रह
By admin | Published: February 15, 2016 11:23 PM2016-02-15T23:23:27+5:302016-02-15T23:57:31+5:30
जुनं ते सोनं : भारतीय नोटांसह परकीय चलनाचा समावेश; ग्रामस्थांत अप्रूप
उंडाळे : तुळसण, ता.कऱ्हाड येथील युवकाने जुन्या नाण्यांचा संग्रह केला आहे. प्रसाद जयवंत माने असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे तिनशे वर्षांपूर्वीच्या शिवकालीन, मुघलकालीन नाण्यापासून परकीय चलनातील नोटांपर्यत विविध प्रकारच्या चलनाचा जणू खजिनाच आहे. त्याचा हा नाण्यांचा अद्भूत खजिना पाहताना पाहणाराही थक्क होत आहे. प्रसादला वयाच्या बाराव्या वर्षांपासून नाणी जमा करण्याचा छंद आहे. घरी आई वडिलांनी खाऊसाठी दिलेले, नातलग, पाहुण्यांनी दिलेले पैसे त्यामध्ये काही विशेष आढळले तर तो ते पैसे खर्च न करता संग्रही ठेवत होता. त्यातून त्याला नाणी जमविण्याचा छंद लागला. तेव्हापासून त्याने प्रयत्नपूर्वक इतिहासकालीन नाणी मिळवली. आज त्याच्याकडे सुलतानी सुरी, मुघल, राजा शिवछत्रपतीच्या काळातील भारतीय नाणी आहेत. १९१८ मधील जॉर्ज किंग सहावा, किंग एडवर्ड सातवा यांच्या काळातील चांदवडी (चांदीची नाणी), १९४४ मधील ढब पैसा, १८३३ मधील क्वार्टर आणा , राणी विक्टोरीयाच्या काळातील नाणी पाहायला मिळतात. १९५४ ची अधेली (अर्धा पैसा), सिंहछाप नाणे, दोन आणा, एक नया पैसा, १९४७ मधील जॉर्ज किंग सहावाच्या काळातील आधा रुपया, १९३९ मधील आणा, पाव रुपया, अर्धा आणा, अल्युमिनियम, पितळ, तांबे या धातूूतील १ पैसा, २ पैसे, ३ पैसे, ५ पैसे, १०, २०, २५, ५० पैसे आदी विविध प्रकारच्या नाण्याचा खजिनाच पाहायला मिळत आहे . याशिवाय एरर क्वाईन, प्रिटिंग क्वाईन, नोटा, ज्युबली क्वाईन, फंक्शन क्वाईन, सोशलवर्क क्वाईन , कोलकत्ता, मुंबई प्रांतातील मिन्ट क्वाईन, फेक क्वाईन यासह विविध प्रकारची नाणी आहेत . सध्या चलनात असलेली नवीन १० रुपयाच्या नाण्यापर्यत त्याच्याकडे नाणी आहेत .
याशिवाय त्याला विविध प्रकारची तिकीटे (स्टॅम्प) जमविण्याचा छंद असून, त्याच्याकडे शंभरहून अधिक प्रकारची तिकीटे आहेत . त्यामध्ये एक आण्यापासून ५० रुपयापर्यंत किमतीची तिकीटे आहेत. (प्रतिनिधी)
रुपयापासून हजारपर्यंतच्या नोटा...
नाण्याशिवाय त्याला विविध देशांच्या नोटा जमविण्याचा छंद असून त्याच्याकडे मिस प्रिटिंग नोटा, एरर नोटा, फॅन्सी नंबरच्या नोटा, सिरीयलच्या नोटा, हरीण व मोराचे चित्र असलेल्या १ रुपया पासून १००० रुपयेपर्यंतच्या नोटा आहेत. त्याच्याकडे अमेरिका, चीन, जपान, सिंगापूर, दुबई, श्रीलंका, पाकिस्तान, डेन्मार्क, ओमन, नेपाळ, भूतान, इंग्लंड, बांग्लादेश यासह ५० देशाची विदेशी चलने आहेत. सेंट, डॉलर, धीरम, रियाल, रुपी, रुपया आदी प्रकारची चलने पाहताना प्रसादच्या संग्रहाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
संग्रह करण्यामागे लोकांना जुन्या नाण्याविषयी व परकीय चलनाविषयी ज्ञान व्हावे हा हेतू आहे. माझा हा संग्रह पैशाचे अमिष दाखवून विकत घेण्याचा प्रयत्नही झाला आहे. मात्र तो मी नाकारला. या संग्रहामध्ये आणखी वाढ करून त्यांची लिम्का बुक, गोल्डन बुक, व गिनिज बुकमध्ये नोंद करण्याचा माझा मनोदय आहे .
- प्रसाद माने