अय्याऽऽ पोलीस गाडीत कॉलेजला

By admin | Published: January 29, 2016 12:09 AM2016-01-29T00:09:56+5:302016-01-29T00:32:00+5:30

तरुणींसाठी खुषखबर : फलटणमध्ये बसस्थानक ते महाविद्यालय मोफत सेवा , गुड न्यूज

College of Aya police train | अय्याऽऽ पोलीस गाडीत कॉलेजला

अय्याऽऽ पोलीस गाडीत कॉलेजला

Next

फलटण : शिक्षणासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या मुलींसाठी बसस्थानक ते महाविद्यालयापर्यंत पोलीसगाडीतून मोफत सेवा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शहरात कोणतीही घटना घडल्यास त्याठिकाणी पाच मिनिटांत पोहोचू शकणाऱ्या पोलीस कंट्रोल रुम सेवेचा प्रारंभ पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
बहुसंख्य तरुणी मुधोजी कॉलेज येथे शिक्षणासाठी जातात. बसस्थानकापासून महाविद्यालय दोन किलोमीटरवर असल्याने पायी जाताना त्यांना सडक सख्याहरींच्या छेडछाडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महाविद्यालयीन तरुणींसाठी दोन पोलीस व्हॅन उपलब्ध करून देताना यामध्ये महिला पोलिसांचीही नेमणूक केली आहे. या मोफत सेवेचा सर्वच विद्यार्थिनींनी स्वागत केले आहे. महाविद्यालयाला जाण्या-येणाच्या वेळेत ही सेवा सुरू राहणार असल्याचे शालेय विद्यार्थिंनीचा सुरक्षित प्रवास होणार आहे. पोलीस व्हॅनऐवजी एसटी किंवा इतर पर्याय उपलब्ध करून देण्याचा पर्याय सुरू असला, तरी पोलीस व्हॅन तात्पुरती सुरू ठेवणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे त्यांनी सांगितले.
फलटण शहरात एखादी घटना घडल्यास त्याठिकाणी पाच मिनिटांत पोलीस पोहोचण्यासाठी पीसीआर सेवा सुरू केली आहे. यासाठी दोन पोलीस गाड्या व दहा अतिरिक्त पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याबरोबरच नागरिकांनाही थेट १०० नंबर डायल करून या सेवेचा उपयोग करून घेता येणार आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना
शहरातील वाढती गुन्हेगारी व वाहतूक कोंडी यावर ठोस उपाययोजना सुरू असून, मोठ्याप्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शहरातील बंद पडलेल्या श्रीराम पोलीस चौकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस चौक्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

Web Title: College of Aya police train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.