अज्ञात वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवक ठार, घातपाताचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 04:48 PM2018-01-07T16:48:10+5:302018-01-07T16:59:09+5:30
घरातून जेवण घेऊन येतो, असे सांगून दुचाकीवर गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा दहा ते बारा किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळून आला आहे.
पुसेसावळी : घरातून जेवण घेऊन येतो, असे सांगून दुचाकीवर गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा दहा ते बारा किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. परंतु तो इतक्या लांब का गेला, यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील वडगाव हवेली येथील तुकाराम बाळासाहेब घार्गे (वय १७) हा युवक शनिवारी रात्री घरातून जेवणाचा डबा घेऊन येतो, असे सांगून रघुनाथ घार्गे यांची दुचाकी (एमएच-११-बीएम-९२५५) घेऊन वडगाव-रहाटणी रस्त्यावर असलेल्या घरी गेला. तो परत आलाच नाही.
दरम्यान, वडगाव जयराम स्वामी येथून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कळंबी येथील पुसेसावळी-औंध रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तुकाराम घार्गे याचा जागीच मृत्यू झाला. काही अंतरावरून डबा आणण्यासाठी गेलेला तुकाराम घार्गे कळंबनजीक का गेला, हा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत असून, घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी संतोष घार्गे यांनी औंध पोलिसांत तक्रार दिली आहे. हवालदार एस. बी. रसाळ तपास करीत आहेत.
तुकाराम डेअरीत करायचा अभ्यास
तुकाराम घार्गे हा बारावीत होता. परीक्षा जवळ आल्याने तो रघुनाथ घार्गे यांच्या दूध डेअरीत अभ्यास करत होता. रात्री उशीर झाल्याने घरातून डबा आणतो, असे सांगून तुकाराम हा रघुनाथ घार्गे यांची दुचाकी घेऊन गेला होता.